मुंबई : मुंबई महानगरपालिकेची केईएम, शीव, नायर आणि कूपर वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये आंतरवासिता करणाऱ्या ८०३ डॉक्टरांना राज्य सरकारने निश्चित केलेल्या विद्यावेतनापेक्षा कमी वेतन दिले जात आहे. त्यामुळे या डॉक्टरांना शिक्षण घेताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पूर्ण विद्यावेतन मिळावे यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य सरकारच्या आदेशानुसार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आंतरवासिता करणाऱ्या डॉक्टरांना दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आंतरवासिता करणाऱ्या डॉक्टारांना १८ हजार रुपये विद्यावेतन मिळते. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या नियमाची अद्याप अमलबजावणी करण्यात आलेली नाही. महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात आंतरवासिता करणाऱ्या ८०३ डॉक्टरांना फक्त ११ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना राज्य सरकारच्या नियमानुसार विद्यावेतन मिळावे यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप डॉक्टरांनी केला आहे.

हेही वाचा…मुंबई : अमली पदार्थांची तस्करी प्रकरणी परदेशी व्यक्तीला अटक, पोटातून बाहेर काढल्या १० कोटीच्या कोकेनच्या ११० कॅप्सूल

प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे डॉक्टरांचे मोठे नुकसान होत असून, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयात आणि मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आतंरवासिता करणारे डॉक्टर समान काम करीत आहेत. मात्र मुंबई महानगरपालिका प्रशासन आपल्या वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णालयांतील डॉक्टरांबाबत दुजाभाव करीत आहे, असा आरोप डॉक्टरांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील. सुरुवातीला काळ्या फिती लावून काम करण्यात येईल. वेळप्रसंगी आंदोलनही करण्यात येईल, असा इशारा आंतरवासिता डॉक्टरांच्या संघटनेकडून देण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctors in mumbai municipal medical colleges protest over unpaid stipends mumbai print news psg