लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची ३ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये डॉक्टरांच्या सुविधेचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. पूर्ण जिल्ह्यासाठी एकच मतदान केंद्र, सुट्टीऐवजी कामकाजाच्या दिवशी निवडणूक, अर्ज उपलब्ध करण्यास झालेला विलंब यामुळे किचकट झालेली निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी निवडणूक पुढे ढकलावी, असे पत्र ‘असोसिएशन ऑफ मेडिकल कन्स्लटंट’ या डॉक्टरांच्या संघटनेने निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहे. यापूर्वी हिलिंग हॅण्ड युनिटी पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणाऱ्या डॉक्टरांच्या पॅनेलनेही निवडणूक प्रक्रियेबाबत आक्षेप घेत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा कारभार मागील दोन वर्षांपासून प्रशासकाच्या हाती होता. मात्र आता राज्य सरकारने परिषदेची निवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ३ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. ३ एप्रिल हा दिवस कामकाजाचा असल्याने बहुतांश डॉक्टर रुग्णालयातील कर्तव्ये, खाजगी प्रॅक्टिस आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोहचण्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये फक्त एकच मतदान केंद्र असल्याने डॉक्टरांना रुग्णसेवा करून मतदान केंद्रावर पोहचणे अशक्य होणार आहे.

मुंबईसारख्या शहरांमध्ये कामकाजाच्या दिवसांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी असते. तर ग्रामीण भागामध्येही डॉक्टरांना कामाच्या ठिकाणाहून मतदान केंद्रावर पोहचण्यासाठी बराच प्रवास करावा लागणार आहे. याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी निवडणुका साधारणपणे रविवारी घेण्यात आल्या होत्या. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होत होती. त्यामुळे मतदान रविवारी किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी घेण्यात यावे, दुर्गम भागात काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यातील मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी, तसेच सध्या अनेक वैद्यकीय संस्थांच्या निवडणुका या ऑनलाईन पद्धतीने हाेत आहेत. त्यामुळे निवडणुका ऑनलाईन घेण्यासंदर्भात विचार करण्यात यावा, अशा सूचना ‘असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स’च्या व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. सुजाता राव यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

डॉक्टरांचे हित लक्षात घेता व एक चांगली निवडणूक व्हावी यासाठी निवडणुकीचे वेळापत्रक आणि मर्यादित मतदान केंद्राच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक वेळ घ्यावा, यासाठी निवडणूक काही दिवस पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणीही ‘असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स’कडून करण्यात आली आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनाही पत्र

निवडणूक प्रक्रियेतून ७० हजार डॉक्टरांना वगळण्यात आले आहे. या डॉक्टरांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करावे यासाठी ‘हिलिंग हॅण्ड युनिटी पॅनेल’कडून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे. तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी त्यांनी लक्ष घालावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे.

Story img Loader