मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पोटदुखी, अस्वस्थता आणि उलट्या यासारखा त्रास होत असलेल्या १० वर्षीय मुलीच्या पोटातून ५० सेमी लांबीचा केसांचा गुंता काढण्यात परळच्या वाडिया रुग्णालयामधील डॉक्टरांना यश आले. या मुलीवर गॅस्ट्रोटॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली. रॅपन्झेल सिंड्रोम नावाचा दुर्मिळ विकार या मुलीला झाल्याचे निदर्शनास आले. हा विकार १० पैकी सुमारे ८ प्रकरणांमध्ये लहान मुले, किशोरवयीन मुली आणि ३० वर्षांखालील तरुणींमध्ये दिसून येतो.
वसई येथे राहणाऱ्या १० वर्षीय मुलीला १५-२० दिवसांपासून पोटदुखी, अस्वस्थता आणि उलट्या होत होत्या. तिच्या आई – वडीलांनी तिला परिसरातील काही डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. परंतु निदान होऊ शकले नाही. मुलीच्या पालकांनी तिला वाडिया रुग्णालयात उपचारासाठी आणले असता मुलीला बद्धकोष्ठता, कुपोषण, वजन कमी होणे आणि ४-५ दिवसांपासून ओटीपोटात तीव्र वेदना होत असल्याची लक्षणे आढळून आली. वैद्यकीय तपासणीत मुलीच्या पोटात केसांचा गुंता आढळला. तिला ट्रायकोफॅगिया (केस खाणे), ट्रायकोटिलोमॅनिया (केस खेचणे) याचे निदान झाले.
केस खाल्ल्यामुळे मुलीला रॅपन्झेल सिंड्रोम झाला होता. ही एक दुर्मिळ स्थिती आहे. ज्यामध्ये केसांचा मोठा गुंता पोटात अडकतो आणि तो लहान आतड्यात पसरतो. रॅपन्झेल सिंड्रोम प्रामुख्याने मानसिक विकार असलेल्या तरुण महिलांमध्ये होतो. शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.मुलीला दुर्मिळ रॅपन्झेल सिंड्रोम असल्याने आम्ही खूप घाबरलो होतो. मात्र वाडिया रूगणालयातील डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने आमच्या मुलीला नवीन आयुष्य मिळाले, असे मुलीच्या आईने सांगितले.