मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट पीजी परीक्षा यंदा दोन सत्रामध्ये घेण्याचा निर्णय वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाने घेतला आहे. मात्र परीक्षा दोन सत्रात घेतल्यास गुणाचे सामान्यीकरण करण्यामध्ये अनियमितता येऊन परीक्षार्थींवर अन्याय होण्याची शक्यता असल्याचा मुद्दा उपस्थित करत नीट पीजी परीक्षा दोन सत्रात घेण्यास डॉक्टरांच्या संघटनांनी विरोध केला आहे. तसेच ही परीक्षा एका सत्रात घेण्यासाठी वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाला पत्र पाठवण्यात आले आहे.

वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाने नुकतेच नीट पीज परीक्षेची तारीख जाहीर केली. ही परीक्षा संगणकावर आधारित दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर नीट पीजी परीक्षेला अर्ज करणारे उमेदवार, डॉक्टर, डॉक्टरांच्या संघटनांनी समाजमाध्यमांवरून सामान्यीकरण प्रक्रिया आणि चाचणीच्या निष्पक्षतेबद्दल चिंता व्यक्त करीत परीक्षा दोन सत्रात घेण्यास विरोध केला आहे. परीक्षा दोन सत्रात घेतल्यास विद्यार्थ्यांवर अन्याय होईल.

२०२४ मध्ये ही परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली होती. त्यावेळी गुणाचे सामान्यीकरण करण्यामध्ये अनियमितता झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे यंदाही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. वेगवेगळ्या सत्रांसाठी वेगवेगळे प्रश्न असतात. परीक्षेच्या काठीण्यपातळीमध्ये तफावत असू शकते. यामुळे सामान्यीकरण प्रक्रियेमध्ये अनियमितता निर्माण होऊन परीक्षार्थींवर अन्याय होऊ शकतो, असे डॉक्टरांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने (फाईमा) वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाला पत्र पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

दोन सत्रात घेतल्यास उद्भवणाऱ्या समस्या

एकाच सत्रात परीक्षा घेतल्यास सर्व विद्यार्थ्यांसाठी समान प्रश्न आणि एकसमान काठीण्यपातळी राहील. परिणामी, सामान्यीकरणाची गरजच भासणार नाही आणि परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता अबाधित राहील. दोन सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास कायदेशीर आव्हाने आणि वादविवाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेस विलंब होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना अनावश्यक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

परीक्षेसाठी तयारी करताना विद्यार्थ्यांवर आधीच मोठा मानसिक ताण असतो. अशा परिस्थितीत, सामान्यीकरणासारखी अनिश्चितता त्यांच्या तणावात अधिक भर घालते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी आणि परीक्षेवरील विश्वास दृढ राहावा यासाठी ही परीक्षा एकाच सत्रात घेणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून न्याय, पारदर्शकता आणि गुणवत्ता यांना प्राधान्य देता येईल, असे ‘फाईमा’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अक्षय डोंगारदिवे यांनी सांगितले.

समाजमाध्यमावर तीव्र संताप

२०२४ मध्ये सामान्यीकरणाचा गोंधळ झाला असतानाही परीक्षा मंडळाने दोन सत्रामध्ये नीट पीजी परीक्षा घेण्याची घोषणा केली. यामुळे उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनुचित गुणांकन, कायदेशीर वाद या चुका पुन्हा का करायच्या ? असा प्रश्न एका डॉक्टरने ‘एक्स’वर उपस्थित केला आहे. परीक्षा दोन सत्रात घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती युनायटेड डॉक्टर्स फ्रंटने ट्विटमध्ये केली आहे.

Story img Loader