मुंबई : वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १४३२ जागा भरण्याचा प्रस्ताव मान्य करावा, महागाई भत्ता लागू करावा, करोना काळात मानधनातूत झालेली कपात परत द्यावी, प्राध्यापक भरती करा वसतिगृहांची डागडुजी करा अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून संप पुकारला आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता असली तरी रुग्णालय प्रशासनाकडून योग्य काळजी घेण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी ‘मार्ड’ने सोमवारी सकाळी ८ वाजता नायर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी उपस्थित राहून आंदोलनाला सुरुवात केली. तसेच जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही आंदोलनाला सुरुवात केली. या संपामध्ये राज्यातील साधारणपणे पाच हजार निवासी डॉक्टर सहभागी होणार आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता असली, तरी रुग्णालय प्रशासनाने केलेल्या पर्यायी व्यवस्थेमुळे सकाळी फारसा परिणाम दिसून आला नाही.
‘मार्ड’ने अतिदक्षता विभाग वगळता बाह्यरुग्ण विभाग आणि अन्य आरोग्य सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागांची जबाबदारी विभाग प्रमुख, वरिष्ठ डॉक्टर, सहाय्यक, सहयोगी प्राध्यापक यांच्यावर सोपवल्याने फारसा परिणाम जाणवला नाही. दरम्यान राज्य सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल न उचलल्यास आम्हाला आमचे आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल, असा इशारा ‘मार्ड’कडून देण्यात आला आहे. त्यामुळे जर मार्डने अति महत्त्वाच्या सेवा थांबल्यास त्याचा मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.