राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेतील डॉक्टरांच्या संपकाळात झालेले रुग्णांचे मृत्यू चर्चेचा विषय बनले असतानाच आता महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील चार हजार निवासी डॉक्टर शनिवारपासून बेमुदत संपावर जात आहेत. निवासी डॉक्टर म्हणून कराव्या लागणाऱ्या ‘बॉण्ड सव्‍‌र्हिस’मध्ये (बंधपत्र) सुसूत्रता आणणे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षे थकलेल्या शुल्कमाफीचे पैसे लवकरात लवकर अदा करणे अशा दोन प्रमुख मागण्यांसाठी डॉक्टरांनी संपाचा पवित्रा घेतला आहे.
निवासी डॉक्टरांची सेवा गेल्या वर्षीपासून अत्यावश्यक सेवा कायद्यात (मेस्मा) समाविष्ट करण्यात आली आहे. मात्र, ‘मेस्मा’अंतर्गत कारवाईला भीक न घालता राज्यातील तब्बल चार हजार निवासी डॉक्टर शनिवारपासून संपावर जाणार आहेत. निवडणुका तोंडावर आल्या असल्याने आपल्या अनेक महिन्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या हेतूने मार्डने संपाची हाक दिल्याची चर्चा आहे. याच मागण्यांकरिता मार्डने काही काळापूर्वी चार दिवसांचा संप केला होता. त्या वेळी दिलेले आश्वासन सरकारने न पाळल्यामुळे पुन्हा संप करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी भूमिका ‘मार्ड’च्या वतीने डॉ. संतोष वाकचौरे यांनी मांडली. यामुळे राज्यातील वैद्यकीय सेवा विस्कळीत होणार आहे.  

Story img Loader