मुंबई : गृह खात्याच्या अखत्यारित असलेल्या मुंबईतील पाच महत्त्वाच्या रुग्णालयांमधील शवागृहात शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची संख्या कमी असून त्याचा परिणाम सेवेतील डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर होत आहे. तसेच यापैकी काही रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मोठ्या प्रमाणावर  मृतदेह येत असून शवविच्छेदन करून मृतदेह मिळण्यास विलंब होत आहे. ही बाब लक्षात घेऊन शवागृहातील डॉक्टरांच्या रिक्त जागा महिनाभरात कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती न्याय वैद्यकशास्त्र सल्लागार विभागाचे पोलीस शल्य चिकित्सक डॉ. कपिल पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याच्या गृह विभागाकडे मुंबईच्या पाच रुग्णालयांमधील शवागृहांचे नियंत्रण आहे. यामध्ये जे.जे., राजावाडी, भगवती, कूपर आणि सिद्धार्थ या रुग्णालयांचा समावेश आहे. या शवागृहांमध्ये शवविच्छेदन करण्यासाठी प्रत्येकी चार डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. त्यानुसार पाच शवागृहामध्ये एकूण २० मंजूर पदे असून, त्यातील पाच पदे रिक्त आहेत. राजावाडी रुग्णालयातील दोन, जे.जे. रुग्णालय, सिद्धार्थ रुग्णालय आणि कूपर रुग्णालयातील प्रत्येकी एक पद रिक्त आहे. एक डॉक्टर मागील दोन ते तीन वर्षांपासून कामावरच येत नाहीत. त्यामुळे सहा पदांचा भार अन्य डॉक्टरांवर येत आहे. त्यातच जे.जे. रुग्णालय, राजावाडी रुग्णालय आणि भगवती रुग्णालयमध्ये शवविच्छेदनासाठी येणाऱ्या मृतदेहांची संख्या अधिक आहे. या शवागृहातील शवविच्छेदनाचा भार कमी करण्यासाठी गृह विभागाने काही डॉक्टरांना तेथे प्रतिनियुक्तीवर पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांवर येणारा कामाचा ताण लक्षात घेता रिक्त पाच पदे येत्या महिनाभरामध्ये भरण्यात येणार असून, यासंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असल्याची माहिती डॉ. कपिल पाटील यांनी दिली.