लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : कर्करोगाचे निदान झाल्यानंतर महिला अनेकदा निराश होतात. मात्र प्रत्यक्षात धीराने या आजाराला सामोरे गेल्यास त्यातून बरे होणे अधिक सुकर होते. महिलांनी हार न मानता कर्करोगाशी लढा द्यावा, असा संदेश देणाऱ्या माहितीपटाची निर्मिती टाटा रुग्णालय व वुमेन्स कॅन्सर इनिशिएटिव्ह या स्वयंसेवी संस्थेने केली आहे. कर्करोगाला सामोऱ्या जाणाऱ्या महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी हा उपक्रम करण्यात आला असून कर्करोगाशी लढा देणाऱ्या अनेक महिलांचा प्रवास या माहितीपटातून दाखवण्यात आला आहे. या माहितीपट अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा प्रसार समाजमाध्यमांतून करण्यात येणार आहे.
कर्करोग रुग्णांचे सक्षमीकरण करण्यासाठी ‘वुमन कॅन्सर सर्व्हायव्हर्स मीट २०२५ ‘ कार्यक्रमाचे नुकतेच टाटा रुग्णालयाकडून आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. त्यावेळी कर्करोगातून बऱ्या झालेल्या महिलांचा सन्मान माहितीपटाच्या प्रदर्शनावेळी करण्यात आला. कर्करोगतज्ज्ञ डॉ. वनिता नोरोन्हा यांच्यावर आधारित हा माहितीपट असून स्वतः स्तनाच्या कर्करोगातून त्या बऱ्या झाल्या आहेत. कर्करोगाने त्रस्त असतानाही डॉ. नोरोन्हा यांनी हिंमत गमावली नाही. त्यांच्या कर्करोगाबरोबरील लढाईचा संघर्ष या माहितीपटात दाखविण्यात आला आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केले आहे.
फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२४ निकीता पोरवाल यांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी लढा दिला आहे. त्याबाबत निकिता यांनी या माहितीपटात संवाद साधला आहे. निकिता यांना किशोरावस्थेतच हा आजार झाला होता. त्यामुळे स्वतःला कर्करोग झाल्यानंतर या प्रश्नावर आणि या आजाराला सामोऱ्या जाणाऱ्या इतर महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे निकिता यांनी सांगितले. त्याचबरोबर सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देणे आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण आणि त्यातून बऱ्या झालेल्या व्यक्तींसमोर अभिनेत्री हिना खानने तिचे अनुभव मांडले. कर्करोगाशी लढाई सुरू असतानाच या विषयांत कमा करण्याची प्रेरणा मिळाल्याचे दंतचिकित्सक आणि माजी सैनिक डॉ. रितू बियाणी यांनी सांगितले. डॉ. सौम्या मॅथ्यूज आणि डॉ. भाविका कोठारी यांनी कर्करोगातून मुक्त झालेल्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत.
जगभरात २३ लाख महिलांना स्तनाचा कर्करोग
जगभरात २०२२ मध्ये जवळपास २३ लाख महिलांना स्तनाचा कर्करोग झाला होता. स्तनाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण दरवर्षी अडीच टक्क्यांनी घटत असल्याचे दिसते आहे.