नितीन गडकरी यांना भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यासाठी पक्षामध्येच कट रचण्यात आला होता, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. गो. वैद्य यांनी केल्यानंतर आता भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यावर पलटवार केला.
गडकरी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा दुसऱयांदा येऊ न देण्यामागे संघाचे नेते सुरेश सोनी यांचाच हात होता. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आदेशांकडे दुर्लक्ष केले, असा आरोप आता भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी केला आहे.
पक्षातील आपापसातील मतभेद दूर करण्यासाठी भाजपच्या नेत्यांची बैठक गुरुवारी मुंबईत होते आहे. सुरेश सोनी यांच्याबद्दल संघामध्ये नाराजीचे वातावरण आहे. संघाच्या रचनेत सरसंघचालक हे सर्वोच्च स्थानी आहेत, असा संदेश संघटनेमध्ये पुन्हा एकदा देण्यासाठी सोनी यांची लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोनी यांनी संघाचे सरचिटणीस भैय्या जोशी यांच्याशी चर्चा केली.
भागवत यांनी गडकरी यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱया टर्मला हिरवा कंदील दिला होता. त्यांना जर आपला निर्णय बदलायचा होता, तर त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूकच पुढे ढकलायला हवी होती, असे भाजपमधील नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षातील कोणीही उघडपणे संघाच्याविरोधात बोलायला तयार नाही. मात्र, संघातील अंतर्गत मतभेदांचा फटका भाजपला बसतो आहे, असे पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांचे मत आहे.
भाजपचे आणि संघाचे एक वरिष्ठ नेते म्हणाले, गडकरी यांच्याबद्दल प्रदेश कार्यकारिणी फारशी चिंतित नाही. राजनाथसिंह यांना पक्षाचे अध्यक्ष केल्याबद्दलही आम्हाला अडचण नाही. मात्र, यानिमित्ताने संघातील मतभेद चव्हाट्यावर आले हे योग्य नाही.

Story img Loader