भूतदयेपेक्षा नागरिकांवर ज्योतिषाच्या सल्ल्याचा परिणाम
गायीला चारा घालणे, पक्ष्यांना धान्य टाकणे, विशिष्ट सणांना प्राण्यांसाठी नैवेद्य ठेवणे अशा प्रकारची कार्य धार्मिकता म्हणून आपल्याकडे नित्यनियमाने केली जातात. मात्र आता या प्राण्यांमध्ये कुत्र्यांचीही भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून धार्मिक कार्यात कुत्र्यांनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले असून त्यांना दूध दिल्याने ‘दोषमुक्ती’ होते या ज्योतिषाच्या सल्ल्यामुळे परळच्या ‘बाई साखराबाई डिनशॉ पेटीट’ रुग्णालयात दुधाचा रतीब सुरू झाला आहे.
भारतीय संस्कृतीत दोषमुक्ती व मोक्षप्राप्तीसाठी दानाला खूप महत्त्व दिले जाते. आतापर्यंत गायींना चारा, कबुतरांना धान्य दिले जात होते. आता या यादीत कुत्र्यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. परळच्या ‘बाई साखराबाई डिनशॉ पेटीट’ रुग्णालयातील कुत्र्यांना गेल्या सहा महिन्यांत पोट भरून दूध प्यायला मिळू लागले आहे. गेल्या सहा महिन्यांत १० ते १२ जणांनी अशा प्रकारे दुधाचे दान केले आहे. घरातील त्रास, दु:ख कमी होण्यासाठी ज्योतिषाने सव्वाशे कुत्र्यांना दूध देण्याचा सल्ला दिला असल्याचे ही कुटुंबे सांगतात, असे या रुग्णालयाचे सचिव कर्नल (डॉ) जे. सी. खन्ना यांनी सांगितले. मात्र फक्त सव्वाशे कुत्र्यांसाठी दूध स्वीकारत नसल्याने रुग्णालयातील प्रत्येक कुत्र्याला दूध दिले जावे, अशी मागणी रुग्णालयाकडून केली जाते. यासाठी ही मंडळी तयार होतात. यामध्ये अधिकतर जैन, गुजराती कुटुंबांचा समावेश आहे.
एक महिन्यापूर्वी दीपक चावला यांनी या रुग्णालयातील कुत्र्यांना दुधाचे दान केले होते. यासाठी त्यांनी सात हजार रुपये खर्च केले. आमच्या ज्योतिषाने दोषमुक्तीसाठी आणि घरात भरभराट व्हावी यासाठी श्वानांना दूध देण्याचा सल्ला दिल्याचे दीपक चावला यांनी सांगितले. अशा प्रकारे ज्योतिषावर विसंबून स्वत:ची भरभराट करण्याच्या हेतूने येणाऱ्या कुटुंबाबाबत खन्ना यांनी खंत व्यक्त केली. या मुक्या प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ किंवा दूध घेऊन येणे हे समाजभान व भूतदया आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी कुत्र्यांना लक्ष्य केले जात असल्याचे ते म्हणाले. नैवेद्य म्हणून तेलकट-तूपकट पदार्थ या प्राण्यांना खायला दिल्याने त्यांना पोटाचे आजार होतात, असेही त्यांनी नमूद केले.