प्राणी पालनाची हौस ‘पेट इण्डस्ट्री’ बनून भारतीय व्यासपीठावर आली, तेव्हा १९९४ साली भारतात ‘हम आप के हैं कौन’ हा चित्रपट दाखल झाला होता. त्यात कुणाला माधुरीचे हसणे भावले, कुणाला सलमानचे दिसणे किंवा कुणाला त्यातली मेंडोलिनचा वापर झालेली गाणी आवडली असतील. या चित्रपटाचे कथानक, संगीत आणि त्यात काम करणारे दिग्गज कलाकार यांबरोबरच एक पात्र चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात राहिलं, ते म्हणजे ‘टफी’. चित्रपटाच्या क्लायमॅक्सची जबाबदारी पेलणाऱ्या पॉमेरिअन जातीच्या या कुत्र्याने चित्रपटातील कलाकारांहून काकणभर जास्तच भाव खाल्ला. भल्या मोठय़ा बंगल्याच्या हिरवळीवरून धावत येणारा पांढराशुभ्र टफी हे दृश्य अनेकांच्या मेंदूत कळत नकळतपणे कोरले गेले असेल. भारतातील कानाकोपऱ्यांत परदेशी प्रजातींच्या कुत्र्यांचे वेड पोहोचवण्यात या चित्रपटाने मोठा हातभार लावला. ‘पेट इंडस्ट्री’ची गणिते बनवण्यात या चित्रपटाचा प्रभाव वादातीतच आहे.

‘हम आप के हैं कौन’पूर्वी पक्षी-प्राण्यांचा वापर करून अनेक चित्रपट आले. १९८५ मध्ये ‘तेरी मेहेरबानियाँ’मुळे काळ्या रंगाच्या लॅबॅड्रोर कुत्र्याला मोठा भाव आला होता. १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैने प्यार किया’मुळे प्रेयसीला चिठ्ठी नेऊन देणाऱ्या पांढऱ्याशुभ्र कबुतरांना (चायनीज) बाळगण्याचा शौक देशभरात बळावला. पण भारतीयांमध्ये श्वानप्रेमाची लाट ‘हम आप के हैं कौन’मधील टफीने आणली. घराबाहेर रक्षणासाठी म्हणून बांधलेले कुत्रे हे घरातील दिवाणखान्यात दाखल आले. अर्थातच खुल्या झालेल्या बाजारपेठेने, बदलत चालणाऱ्या अर्थव्यवस्थेने आणि आक्रसत जाणाऱ्या कुटुंबव्यवस्थेने याला हातभार लावला. तोपर्यंत मोठय़ा एकत्र कुटुंबाऐवजी आटोपशीर कुटुंबापर्यंतचा प्रवास अनेकांनी पूर्ण केला होता. त्यात आता पाळीव कुत्र्याच्या रूपाने हळवा कोपरा सामावला गेला. बहुतेक इमारती, चाळी, कॉलनीमध्ये दोन-तीन घराआड तरी पॉमेरिअन बागडू लागले. घरात परदेशी कुत्रे पाळणे हे प्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले. ‘हम आप के हैं कौन’ या चित्रपटाने आणखी एक बदल घडवला. बहुतेक घरांमध्ये कुत्रे पाळले की त्याचे नामकरण मोती, टिपू, राजा, रघू आदी होत असे. पण आता टफी, रॉजर, रॉकी, गोल्डी, ब्राऊनी असे इंग्रजीकरण झाले. वरवर पाहता हा बदल किरकोळ वाटला तरी त्यातून श्वानप्रेमींची मानसिकता कशी घडत गेली ते पाहायला मिळते.  पेडीग्रीच्या जाहिरातीमुळे ‘गोल्डन रिट्रिव्हर’, ‘दिल धडकने दो’ या चित्रपटामुळे ‘ग्रेट डेन’ या प्रजातींना भारतीय श्वानप्रेमींना आपल्यात सामावले. ‘एण्टरटेन्मेंट’ या चित्रपटाने ‘गोल्डन र्रिटीव्हर’ या प्रजातीला नव्याने ग्लॅमर मिळवून दिले. ‘हम आप के..’च्या १९९४ सालापासून आजपर्यंत चित्रपट- जाहिरातींच्या आधारावर विस्तारत गेलेल्या पेट बाजारपेठेने कुत्र्यांच्या परदेशी प्रजातींचे पुष्कळ पर्याय श्वानप्रेमींसाठी उपलब्ध करून दिले. सध्या एका बिस्किटांच्या जाहिरातीने ‘डॉग बोर्डिग’सारख्या श्वानपालकांना सेवा देणाऱ्या बाजारपेठेला ग्लॅमर मिळवून दिले आहे. चित्रपट-जाहिरातींमध्ये गुणात्मक बदल होतोय, तसाच या उद्योगांमध्येही यापुढे बदल घडेल यात शंकाच नाही.

श्वान जाहिराती

परदेशी प्रजातींच्या कुत्र्यांची एकदा ओळख झाल्यानंतर त्याची बाजारपेठ बघता बघता फोफावली. पॉमेरिअन कुत्रे पाळण्याचा ट्रेंड जवळपास दशकभर टिकला. त्यानंतर ‘हर कुत्ते के दिन आते हैं’ हे बहुतेक प्रजातींनी भारतात अनुभवले. कुत्रे पाळण्याच्या ट्रेण्डला जाहिरातींनीही खतपाणी दिले आणि कुटुंबातील कुत्र्यांच्या वावराचे महत्त्व लक्षात घेऊन कल्पक जाहिरातींमध्ये श्वान कायमच आपले स्थान टिकवून दिसतो. २००६  साली ‘रेमंड’ या कपडय़ांच्या बॅण्डने लॅब्रेडोर जातीच्या पांढऱ्याशुभ्र कुत्र्यांचा वापर जाहिरातीत केला. या जाहिरातीने लॅब्रॅडोरची मोठय़ा प्रमाणावर भुरळ घातली. गुबगुबीत, गोंडस दिसणारी ही पिल्ले मग अनेक घरी दिसू लागली. आकाराने मोठे कुत्रे असूनही शांत स्वभाव आणि कुटुंबप्रेमी असल्यामुळे लॅब्रॅडोर भारतीय कुटुंबांमध्ये सहज मिसळून गेला. त्यानंतर आलेल्या ‘हच’ म्हणजे सध्याच्या वोडाफोन या मोबाइल कंपनीच्या जाहिरातीने ‘पग’ या कुत्र्याचा भाव वाढवला.

हच का कुत्ता

पग जातीच्या कुत्र्याला भारतात हच-व्होडाफोनने ओळख मिळवून दिली. जाहिरातीत आपल्या मालकाच्या मागे मागे फिरणारे हे कुत्रे देशांतील सर्वच शहरांतील गल्लीबोळात मालकांबरोबर दिसू लागले. २००९ मध्ये आलेल्या या जाहिरातींचा प्रभाव इतका होता की, भारतीय प्रजातीच्या कुत्र्याच्या तोंडवळ्याशी साधम्र्य नसूनही ‘पग’ला भारतीय माणसाच्या मनात स्थान मिळाले. आकाराने छोटे असल्यामुळे हे कुत्रेही कुटुंबात सामावले गेले. या काळातील पगच्या लोकप्रियतेमुळे पॉमेरिअनच्या ट्रेण्डची आठवण अनेकांना करून दिली.

Story img Loader