|| अक्षय मांडवकर

वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्डच्या किनाऱ्यालगत गेल्या आठवडय़ात वाहून आलेल्या मृत डॉल्फिनच्या शरीराचे जतन करण्याचा निर्णय कांदळवन संरक्षण विभागाने घेतला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये डॉल्फिनच्या शरीरामधील हाडांचा सांगाडा विलग करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असून उरणच्या किनाऱ्यावर वाहून आलेल्या महाकाय देवमाशानंतर या डॉल्फिनचेही जतन करण्यात येणार आहे.

ऐरोलीतील सागरी आणि जैवविविधता केंद्राच्या आवारामध्ये येत्या काही वर्षांत कांदळवन संरक्षण विभागाकडून महाराष्ट्रातील पहिले सागरी जीवांचे संग्रहालय उभारले जाणार आहे. या संग्रहालयात समुद्रात वास्तव्य करणाऱ्या विविध जीवांचे सांगाडे प्रदर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी सध्या विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी उरणच्या केगाव समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या देवमाशाच्या  सांगाडय़ाचे जतन करण्यात आले होते.

पावसाळ्यात उधाण आलेल्या समुद्र लाटांच्या माऱ्यामुळे किनाऱ्यावर मोठय़ा संख्येने मृत किंवा जखमी सागरी जीव वाहून येतात. यात डॉल्फिन, समुद्र कासव यांची संख्या मोठी आहे. मात्र किनाऱ्यावर आलेल्या सागरी सस्तन प्राण्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे काही नियम आहेत. त्यानुसार प्राण्याचे शरीर मोठय़ा प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असल्यास त्याला किनाऱ्यावरच पुरले जाते तर शरीर सुस्थितीत असल्यास जैविक परीक्षणासाठी त्याचे शवविच्छेदन करून त्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाते. वांद्रेजवळ गेल्या गुरुवारी इंडो-पॅसिफिक हम्पबॅक प्रजातीचा डॉल्फिन मृत अवस्थेत वाहून आला होता. मृत शरीर सुस्थितीत असल्याने कांदळवन संरक्षण विभागाने ते ताब्यात घेतले. त्यानंतर परळच्या बैलघोडा रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याची रवानगी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॅक्सीडर्मी केंद्रात करण्यात आली. ‘ब्ल्यू व्हेल’ माशाप्रमाणेच या डॉल्फिनचेही जतन केली जाईल.