कल्याण-डोंबिवली पालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या सावरकरनगर प्रभागाच्या नगरसेविका अर्चना कोठावदे शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून राहत्या घरातून बेपत्ता झाल्या आहेत, अशी तक्रार भाजपतर्फे रामनगर पोलीस ठाण्यात शनिवारी संध्याकाळी करण्यात आली. मंगळवारी होणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विरोधकांकडून हे कृत्य केले असल्याचा संशय भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
नगरसेविका अर्चना कोठावदे पालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्या आहेत. स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेचे दीपेश म्हात्रे इच्छुक आहेत. सत्ताधाऱ्यांचे समितीमधील संख्या बळ शिवसेना-भाजपचे मिळून एकूण सहा सदस्य आहेत, तर समितीमध्ये मनसेचे चार, काँग्रेस आघाडीचे पाच असे विरोधी नऊ सदस्य आहेत. गेल्या साडे तीन वर्षांच्या काळात मनसेचा टेकू घेऊन शिवसेनेने स्थायी समिती सभापतीपद पदरात पाडून पालिकेची तिजोरी आपल्या हातात ठेवण्यात यश मिळवले होते. मात्र नुकत्याच झालेल्या परिवहन समिती निवडणुकीत शिवसेनेने मनसेला ठेंगा दाखवल्याने, तसेच लोकसभा निवडणुकीत मनसेचा विखारी प्रचार सेनेकडून झाल्याने स्थायी समिती निवडणुकीत त्याचा वचपा मनसेकडून काढला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या खेळीचा भाग म्हणून भाजप व आघाडीचा एक सदस्य स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या तोंडावर बेपत्ता झाल्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे काही नगरसेवक मनसे नेत्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. मनसे, काँग्रेस आघाडीने एकत्र येऊन सभापती मिळवायचे आणि सत्ताधारी शिवसेनेला दणका देण्याची खेळी आखली जात आहे.
भाजपचे पदाधिकारी नगरसेविका कोठावदे यांच्या घरी शुक्रवार संध्याकाळपासून पक्षादेश देण्यासाठी चकरा मारत आहेत. त्या बाहेरगावी गेल्याचे त्यांना घरातून सांगण्यात आले. त्यांचे दोन्ही भ्रमणध्वनी बंद आहेत. त्यामुळे शनिवारी डोंबिवलीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. स्थायी समिती सभापती निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांचे अपहरण झाल्याची शक्यता असून विरोधकांनी हे कृत्य केल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, स्थायी समिती निवडणुकीच्या तोंडावर घोडेबाजाराला ऊत आला आहे. यामध्ये अपक्ष सदस्यांचा भाव सर्वाधिक वधारला असल्याचे
बोलले जात आहे.