मुंबई : मंत्रिमंडळात संधी नाकारण्यात आलेले डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या संघटपर्व समितीचे प्रभारी म्हणून शनिवारी नियुक्ती करण्यात आली. पुढील महिन्यात त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> रोजगार, शेती, सौरऊर्जा क्षेत्रांत ‘मित्रा’ने दिशादर्शक काम करावे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला व त्यांच्याकडे महसूल हे महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले. चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाईल, अशी चर्चा आहे. पुढील महिन्यात शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनात चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. तत्पूर्वी संघटनपर्व पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. भाजपची संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली. राज्यात २१ डिसेंबरपासून संघटनपर्व सुरू करण्यात आले असून त्याची सुरुवात नुकतीच नागपूर येथून कऱण्यात आली आहे.

अनुशासन समितीचे अनिल सोले प्रमुख

बावनकुळे यांनी आणखी दोन समितीच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी नागपूरचे माजी आमदार प्रा. अनिल सोले यांची नियुक्ती केली असून किशोर शितोळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी आमदार अतुल शहा व योगेश गोगावले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची घोषणाही करण्यात आली. या अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस प्रा.राजेश पांडे (पुणे) व बीड येथील प्रवीण घुगे यांची सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli mla ravindra chavan appointed as a in charge of the bjp s organisation planning panel zws