तिकीट दरातील कपात आणि गर्दीतील प्रवास टाळण्यासाठी मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू लागला आहे. डोंबिवली आणि ठाणे स्थानकांतून प्रवास करणारे प्रवासी मोठ्या संख्येने वातानुकूलीत लोकलला पसंती देत असून फेब्रुवारी ते जुलै २०२२ या सहा महिन्यांत दोन्ही स्थानकांमध्ये एक लाख ७९ हजार २४१ तिकीटांची विक्री झाली. गेल्या मे महिन्यात वातानुकूलीत लोकलला पसंती मिळणाऱ्या स्थानकांमध्ये डोंबिवलीबरोबर सीएसएमटी स्थानकाचा समावेश होता. मात्र आता ठाणे स्थानकाने आघाडी घेतली असून त्यापाठोपाठ कल्याण स्थानकातूनही वातानुकूलीत लोकलमधून प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : एसी लोकलविरोधात रोष कशासाठी? सामान्य लोकलचा प्रवासी दुर्लक्षित?

मध्य रेल्वेवर ५ मेपासून तिकीट दरात कपात केल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढला. १४ मेपासून सीएसएमटी ते कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ मार्गांवर १२ वातानुकूलित सेवा वाढविण्यात आल्याने मेन लाईनवरील एकूण वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ४४ वरून ५६ वर पोहोचली. यामध्ये टिटवाळा आणि अंबरनाथ मार्गावरील प्रवाशांनाही गर्दीच्या वेळी वातानुकूलित सेवेचाही लाभ घेता येत आहे. शहर आणि उपनगरातील वातानुकूलित वाहतूक सेवांच्या तुलनेत वातानुकूलित लोकलचा प्रवास सर्वात किफायतशीर असल्याचा दावा मध्य रेल्वेने याआधीच केला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फेब्रुवारी २०२२ मध्ये पाच हजार ९३९ होती. ही संख्या जुलैमध्ये ३४ हजार ८०८ इतकी झाली.

डोंबिवली स्थानकात फेब्रुवारी ते जुलै या महिन्यात सर्वाधिक तिकीट विक्री –

मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकात फेब्रुवारी ते जुलै या महिन्यात सर्वाधिक तिकीट विक्री झाली. या काळात ९४ हजार तिकिटांची विक्री झाली असून, या स्थानकातून तीन कोटी ४१ लाख ५३ हजार ६१० रुपये उत्पन्न मिळाले. तर ठाणे स्थानकांत सहा महिन्यात ८४ हजार ३०९ तिकिटांची विक्री झाली, असून दोन कोटी ९५ लाख ५२ हजार ४१० रुपये उत्पन्न मिळाले. कल्याण स्थानकात ७७ हजार ४१२ तिकिटांची खरेदी करण्यात आली असून याद्वारे मध्य रेल्वेला तीन कोटी २१ लाख ८१ हजार ८०४ रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

फेब्रुवारी ते जुलैदरम्यान अन्य काही स्थानकांत झालेली तिकीट विक्री –

एकूण तिकीट विक्री
सीएसएमटी- ७० हजार ४४४
बदलापूर – १८ हजार ६६
भायखळा – १८ हजार २४०
कुर्ला – २१ हजार ३९७
दादर – ४६ हजार ८९
घाटकोपर – ५३ हजार ५१२
मुलुंड – ३२ हजार ६७१

Story img Loader