मोबाइल कॅमेऱ्यांमुळे विक्रीत ६० टक्क्यांनी घट

मोबाइलच्या कॅमेऱ्यांचे मेगापिक्सेल वाढू लागले आणि घरगुती वापरासाठी बाजारात दाखल झालेल्या कॅमेऱ्यांचे फ्लॅश मात्र बंद होऊ लागले. सध्या कॅमेऱ्यांच्या बाजारात या छोटय़ा कॅमेऱ्यांच्या विक्रीत ६० टक्क्यांनी घट झाली असून कंपन्याही या कॅमेऱ्यांचे उत्पादन बंद करण्याच्या निर्णयाप्रत पोहोचल्या आहेत.

मोबाइलने सर्व जग आपल्या तळहातावर आणून ठेवले आहे. यातील विविध सुविधांमुळे आपल्या सवयीच्या वस्तूही कालबाह्य़ ठरू लागल्या आहेत. त्यात प्रत्येकाकडे हटकून सापडणारा रोल कॅमेरा तर वरच्या स्थानावर आहे. आधी रोल कॅमेरा, नंतर डिजिटल कॅमेरा यांनी अक्षरश अधिराज्य गाजवले. मात्र, मोबाइलमधील कॅमेऱ्याच्या आगमनानंतर या कॅमेऱ्यांची भुरळ कमीकमी होत गेली. आता तर मोबाइल कॅमेरेही प्रगत-अतिप्रगत होऊ लागले आहेत. मोबाइलमधील मुख्य कॅमेरा आता ४० मेगापिक्सेलपर्यंत पोहोचला असून फ्रंट कॅमेराही दहा मेगापिक्सेलपर्यंत उपलब्ध होऊ लागला आहे. यामुळे घरगुती वापरासाठीच्या छोटय़ा कॅमेऱ्यांच्या विक्रीत कमालीची घट होऊ लागली. या पाश्र्वभूमीवर काही कंपन्यांनी छोटय़ा कॅमेऱ्यांचे उत्पादन कमी केले असून कालांतराने ते बंद करण्याच्या निर्णयाप्रत या कंपन्या पोहोचल्या आहेत.

घरगुती वापरासाठी विकसित करण्यात आलेल्या छोटय़ा कॅमेऱ्यांची विक्री घटली आहे. परंतु छायाचित्रणाचे विद्यार्थी आणि हौशी छायाचित्रकार व्यावसायिक कॅमेऱ्यांना प्राधान्य देतात.
– स्वप्निल आढावकर, फोर्टमधील सेंट्रल कॅमेरा दुकानाचे मालक

स्मार्टफोन आणि टॅबलेटची लोकप्रियता व त्यांत देण्यात येत असलेल्या विविध सुविधांमुळे छोटय़ा कॅमेऱ्यांच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. मात्र, चांगल्या दर्जाच्या छायाचित्रांसाठी व्यावसायिक कॅमेऱ्यांची मागणी वाढते आहे.
– मनीष शर्मा, व्यवस्थापकीय संचालक, पॅनासॉनिक (भारत व दक्षिण आशिया)

 

Story img Loader