मुंबई : मुंबईत हुंडय़ाव्यतिरिक्त इतर कारणांमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाचपटींनी वाढ झाली आहे. घरखर्च, पती-पत्नीमधील मतभेद, अनैतिक संबंध आणि क्षुल्लक कारणांमुळेही त्रास दिल्याच्या तक्रारी येत आहेत. दरम्यान, हुंडय़ासाठी महिलांना मानसिक व शारीरिक त्रास देण्याच्या गुन्ह्यांमध्ये मात्र या वर्षी तुलनेने घट झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षीच्या तुलनेत हुंडय़ाव्यतिरिक्त इतर कारणांवरून महिलांना मानसिक व शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी दाखल प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे महिला घराच्या चार भिंतींमध्येच सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहेत. क्षुल्लक कारणावरून घरातील वादविवाद वाढत आहेत. अनेक कुटुंबांत मुलांचे लग्न झाल्यानंतर घरात कुरबुर वाढत आहे. तसेच क्षुल्लक वादातून सून किंवा आईवडील पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवीत आहेत.

हेही वाचा >>> वर्सोवा-भाईंदर किनारा रस्ता प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती; ७४ कोटींची शुल्क आकारणी

गेल्या वर्षी ऑक्टोबपर्यंत हुंडय़ाव्यतिरिक्त इतर कारणांमुळे कौटुंबिक हिंसाचाराचे केवळ २५ गुन्हे दाखल झाले होते; पण या वर्षी त्यात ५५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत असे १३९ गुन्हे मुंबईत दाखल झाले आहेत.

पूर्वी महिला तक्रार करणे टाळत होत्या; पण आता हुंडय़ाव्यतिरिक्त इतर कारणांमुळे मानसिक व शारीरिक छळाच्या तक्रारी वाढत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

गेल्या वर्षी ऑक्टोबपर्यंत हुंडय़ासाठी महिलांचा शारीरिक व मानसिक छळ केल्याबाबत ७२६ गुन्ह्यांची नोंद झाली होती. या वर्षी हुंडय़ासाठी कौटुंबिक हिंसाचाराचे ६३७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या वर्षी हुंडय़ासाठी महिलांना त्रास देण्याच्या घटनांमध्ये तुलनेने घट पाहायला मिळत आहे. हुंडय़ासाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून १३ महिलांनी आत्महत्या केली आहे.

गेल्या वर्षी याच काळात २० महिलांनी हुंडय़ामुळे कंटाळून आत्महत्या केली होती.

९० टक्के गुन्ह्यांची उकल

मुंबईत ऑक्टोबपर्यंत महिलांविरोधात ४ हजार ९६८ गुन्हे घडले होते. त्यात बलात्कार, विनयभंग, छेडछाड, अपहरण अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यातील ४५२१ प्रकरणाची उकल केली आहे. महिलाविरोधात अत्याचाराचे सुमारे ९० टक्के प्रकरणे सोडवण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे.

जागरूकता वाढली!

हुंडय़ाव्यतिरिक्त सासरी महिलांना त्रास देण्याचे प्रमाण यापूर्वीही अधिक होते. पण, आता महिलांमध्ये जागरूकता वाढली आहे. त्यामुळे तक्रारीचे प्रमाण वाढले. शिक्षणामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही नुकतेच एक सर्वेक्षण केले त्यात अशिक्षित आणि कमी शिकलेल्या महिलांच्या मुलीही चांगल्या शिकल्या आहेत. त्यांनी अगदी बारावीपासून पुढचे शिक्षण घेतल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे, असे महाराष्ट्र महिला परिषदेच्या नीला लिमये यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Domestic violence in mumbai increased five times more this year compared to last year zws