अर्थसंकल्प आणि वार्षिक योजनेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या खात्यांसाठी अधिक तरतूद करण्यात आली आहे. अर्थात सारीच महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे असल्याने या खात्यांना अधिक तरतूद होणे हे स्वाभाविकच आहे. परंतु मतदारसंघांतील कामांसाठी पुरेशी तरतूद न झाल्याने काँग्रेसच्या आमदारांमधील नाराजीची भावना कायम आहे.
राज्याची पुढील आर्थिक वर्षांची योजना ही ४६,९३८ कोटी रुपयांची आहे. यापैकी सुमारे २७ हजार कोटी राष्ट्रवादीकडील खात्यांच्या वाटय़ाला आले आहेत. तर काँग्रेसकडील मंत्र्यांच्या खात्यांना २० हजार कोटींच्या आसपास रक्कम मिळणार आहे. जलसंपदा, ऊर्जा, पाणीपुरवठा, ग्रामीण विकास या खात्यांसाठी वार्षिक योजनेत जास्त तरतूद झाली आहे. ही सर्व खाती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत.