मुंबई : साडेआठ लाख रुपयांच्या सायबर फसवणुकीप्रकरणी डोंगरी पोलिसांनी कारवाई करून ११ आरोपींना अटक केली. आरोपी बनावट शेअर मार्केट ॲपद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक करत होते. ६० वर्षीय तक्रारदारांना एसएमसी नावाच्या बनावट ॲपद्वारे शेअर बाजारात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांची साडे आठ लाखांची सायबर फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी तपासात डोंगरी पोलिसांनी गौतम गोपाल दास (४८) आणि श्रीनिवास राजू राव (३६) यांना डिसेंबर २०२४ मध्ये अटक केली होती.
पुढील तपासात आरोपींनी केलेल्या बँक खात्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याद्वारे ओंकार युवराज थोरात (२७) आणि श्रीकांत बाळासाहेब साळुंखे (२२) यांना अटक करण्यात आली. तसेच बँक खातेधारक ओजस चौधरी (३०) यालाही मुंबई सेंट्रल येथून अटक करण्यात आली. गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोव्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथून आणखी ६ आरोपींना अटक केली. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींकडून १५ हून अधिक महागडे मोबाइलसंच, ५ लॅपटॉप व एक टॅब, २ महागड्या कार, एक जग्वार (५० लाख रुपये) आणि महिंद्रा मझारो (८ लाख रुपये) मोटरगाडी जप्त केली आहे. ही टोळी कंबोडिया, नेपाळ येथे जाऊन ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांशी संपर्क साधत होती. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.