निवडणुकांना अगदी काही दिवस शिल्लक राहिले की, उरल्या-सुरल्या आणि पडेल जागा देण्याचे काँग्रेससारखे वर्तन शिवसेना-भाजपने रिपब्लिकन पक्षाशी करू नये, असा नाराजीचा सूर लावत, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील जागा वाटपाची ताबडतोब चर्चा सुरू करावी, असे आवाहन आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीला एक वर्ष आणि विधानसभा निवडणुकीला सव्वा वर्ष बाकी आहे. आरपीआयने शिवसेना-भाजपशी युती केली आहे. त्यामुळे या दोन्ही प्रमुख पक्षांनी आरपीआयला कोणत्या जागा सुटणार हे चर्चा करून ठरवावे, असे आवाहन आठवले यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
 या पूर्वी आरपीआयची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती होती. परंतु या दोन्ही पक्षांनी कायम आरपीआयला अगदी शेवटच्या क्षणी किरकोळ व पडेल जागा दिल्या. सेना-भाजपने तसे करू नये. आरपीआयला सन्मानाची वागणूक द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आरपीआयला लोकसभेच्या किमान तीन ते चार आणि विधानसभेच्या ३० ते ३५ जागा मिळाव्यात, असे आठवले यांनी सांगितले.
दक्षिण-मध्य मुंबई, लातूर, रामटेक आणि कल्याण या लोकसभेच्या जागा मिळाव्यात अशी आरपीआयची मागणी आहे. त्यासंदर्भात एक महिन्याच्या आत शिवसेना-भाजपने जागा वाटपाची चर्चा सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले.
 राज्यात दलितांचे संरक्षण करण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. याच प्रश्नांवर
१ मेपासून राज्यात ठिकठिकाणी परिवर्तन सभा घेणार असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.

Story img Loader