आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकालाच इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पण इंग्रजीला जवळ करताना आपल्या मातृभाषेला विसरू नका. या दोन्ही भाषांचा समतोल साधा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे केले.
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग आणि राज्य साहित्य-संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभादेवी येथे रवींद्र नाटय़ मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, मराठी भाषा विभागाचे सचिव प्रमोद नलावडे, भाषा संचालक ललिता देठे, राज्य विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड, राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक आदी उपस्थित होते.
या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २०११ या वर्षीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम तसेच श्री. पु. भागवत प्रकाशक पुरस्कार नवचैतन्य प्रकाशनाचे सुप्रिया आणि शरद मराठे यांना प्रदान करण्यात आला. हे दोन्ही पुरस्कार अनुक्रमे ५ लाख आणि ३ लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र या स्वरूपाचे आहेत.
याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. सुधीर रसाळ आणि वसंत अवसरीकर यांना साहित्य-संस्कृती मंडळाची गौरव शिष्यवृत्तीही प्रदान करण्यात आली. गौरव शिष्यवृत्ती प्रत्येकी ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र या स्वरूपाची आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साहित्य-संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या काही पुस्तकांचे, विश्वकोश मंडळाच्या खंड १७ ते १९ च्या इंटरनेट आवृत्तीचे, राज्य मराठी विकास संस्थेच्या काही पुस्तकांचे तसेच ऑडिओ बुक्सचेही प्रकाशन करण्यात आले.
भाषा  हे केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपली संस्कृतीही आहे. आपण एकमेकांशी मराठीत बोलून, मराठी नाटके, चित्रपट, साहित्य यांचा आस्वाद घेत मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी साहित्यिक, वाचक, कलावंत या साऱ्यांचे योगदान असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने विविध उपक्रम राबविण्याचे ठरवले असून यात प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सव आयोजित करणे, संगणकावर मराठीचा अधिकाधिक वापर करणे, मराठी ग्रंथांचे डिजिटायझेशन, मराठी भाषा भवन, न्यायालयात मराठीचा वापर, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून स्थापन केलेली समिती याचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.
विंदा जीवनगौरव पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना के. ज. पुरोहित म्हणाले की,मी इंग्रजीतही लिहू शकलो असतो. मला मराठीच्या तुलनेत पैसेही अधिक मिळाले असते. पण मातृभाषेतून सांगण्याचे जे सुख आहे, ते अन्य कुठेही नाही, हे तरुण पिढीने कायम लक्षात ठेवावे. तर डॉ. रसाळ यांनी सांगितले की, ५०० रुपयांमध्ये मराठी भाषेतील १०० अभिजात ग्रंथ अशी योजना काही वर्षांपूर्वी साहित्य-संस्कृती मंडळाने आखली होती. वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी पुन्हा एकदा असा उपक्रम राबविण्यात यावा. दर पाच वर्षांांनी अशी पुस्तके उपलब्ध करून द्यावीत.
प्रारंभी कौशल इनामदार यांनी अशोक बागवे यांची ‘माझ्या मराठीचा बोल वाजे काळजात खोल’ ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप भिडे यांनी केले.  या कार्यक्रमापूर्वी राज्य वाङ्मय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ‘लोकसत्ता’-पुणेचे विशेष प्रतिनिधी अभिजित घोरपडेंसह ८० जणांना पुरस्कार वितरित करण्यात आले.
क्षणचित्रे
*    श्री. पु. भागवत प्रकाशक पुरस्कार नवचैतन्य प्रकाशनाला
*    विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार के.ज.पुरोहित यांना
*    राज्य वाङ्मय पुरस्कारांचेही वितरण
*    विश्वकोशाच्या १७ ते १९ व्या खंडाच्या इंटरनेट आवृत्तीचे प्रकाशन

Story img Loader