मुंबई : नाशिक जिल्हा बँकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यात येत असून या प्रकरणी सरकारने तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यावर शेतकऱ्यांच्या मागे कर्जवसुलीसाठी तगादा न लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, बीडीडी चाळीसंदर्भात राज ठाकरे यांनी शिंदे यांची भेट घेतली. राज्यात अद्याप चांगल्या पावसाला सुरुवात झालेली नाही. पेरण्यांचे प्रमाणही कमी आहे, अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा सहकारी बँक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्याची गंभीर दखल घेत शिंदे यांनी प्रशासनाला आदेश दिले.