मुंबई : शिवसेनेतील बंडखोर आमदारांमध्ये एक गट असा आहे ज्याला खरोखर जायचे होते, पण दुसरा गट असा आहे ज्याला पळवून नेले, हे आपल्याला लवकरच समजेल. पण ज्यांना परत यायचे त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, आधीही होते व पुढेही राहतील, असे विधान युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
आदित्य ठाकरे हे सध्या मुंबईत ठिकठिकाणी जाऊन शिवसैनिकांना भेटत आहेत. या निष्ठा यात्रेत ते शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. शिवसेना सोडून जाणाऱ्या आमदारांमध्ये थोडी जरी लाज आणि हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवा, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना दिले.
जे स्वत:च्या मनाने गेले असतील, काही दडपणे असतील, इतर काही वेगळय़ा गोष्टी असतील, त्यांना मला एकच निरोप द्यायचा आहे. जिथे तुम्ही गेलात तिथे आनंदी राहा, सुखी राहा. तुमच्याबद्दल आमच्या मनात राग, द्वेष नाही. दु:ख निश्चित आहे की आम्ही तुम्हाला शिवसैनिक समजायचो. तुमच्यावर विश्वास ठेवला होता. ज्यांना परत यायचे आहे त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. याआधीही खुले होते व पुढे खुले राहतील. आमचे मन मोठे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मी प्रत्येक शाखेत आणि ज्या मतदारसंघात जात आहे. जे पळून गेले ते पळून गेले. पण शिवसैनिक हा शिवसेनेसोबतच उभा आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान दोन ते तीन असे तगडे शिवसैनिक आहेत. जे निवडणूक लढायला तयार आहेत आणि जिंकायलाही तयार आहेत, असेही आदित्य म्हणाले.