मुंबई : कल्याण येथून मंगळवारी सकाळी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या एका जलद वातानुकूलित लोकलचे दरवाजे दादर स्थानकात उघडलेच नाहीत. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने पुढील स्थानकात उतरावे लागले. या घटनेची चौकशी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.कल्याण येथून सकाळी ६.३२ वाजता सीएसएमटीला जाणारी जलद लोकल सुटते. ही लोकल सकाळी ७.२४ वाजता दादर स्थानकात पोहोचते. नेहमीप्रमाणे मंगळवारी ही लोकल दादर स्थानकात पोहोचली, मात्र लोकलचे दरवाजे उघडलेच नाहीत.
नक्की वाचा >>Maharashtra News Live Updates : “मी मोदींना इशारा देतोय, महाराष्ट्राच्या गळ्याला नख लावू नका” अनंत गीतेंचं टीकास्त्र; महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट्स एकाच क्लिकवर!
त्यामुळे दादर स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ उडाला. काही मिनिटांनी लोकल पुढे रवाना झाली. अखेर या प्रवाशांना नाईलाजाने पुढील स्थानकात उतरावे लागले. या घटनेची माहिती एका प्रवाशाने ट्वीट करून दिली. या घटनेची चौकशी करण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे उपमुख्य जनपसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी दिली. यापूर्वी मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकलचे दरवाजे उघडण्यात न आल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता. सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात चार वातानुकूलित लोकल असून त्याच्या सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा मार्गावर ५६ फेऱ्या होत आहेत.