रस्त्यांच्या देखभालीचे काम योग्य प्रकारे न करणाऱ्या सल्लागार ‘एसजीएस’ कंपनीला पालिकेतील सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी बाहेरची वाट दाखविली. मात्र आता काँग्रेसला त्याच ‘एसजीएस’चा कळवळा आला असून पुन्हा याच कंपनीची नियुक्ती करण्याची मागणी होऊ लागली आहे.
मुंबईतील खड्डे बुजविण्यात पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना-भाजप युती अपयशी ठरल्याची टीका करीत काँग्रेसने शनिवारी मोर्चा काढला होता. रस्त्यांच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने नेमलेली ‘एसजीएस’ कंपनी योग्य प्रकारे काम करीत नसल्यामुळे स्थायी समितीने या कंपनीचे कंत्राट रद्द केले. त्यावेळी सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाला मान डोलावत काँग्रेसनेही ‘एसजीएस’ला विरोध केला होता. आता मुंबई काँग्रेसचे नेते ‘एसजीएस’ कंपनीची पुन्हा नियुक्ती करण्याची मागणी करीत आहेत. यामुळे काँग्रेसमधील समन्वयाचा अभाव चव्हाटय़ावर आला आहे.
काँग्रेसने किसन जाधव, उपेंद्र दोशी आणि खान मोहम्मद बस्तीवाला यांची पालिकेत समन्वयक म्हणून नियुक्ती केली. मात्र पालिकेतील नेते आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांमध्ये समनव्य साधण्यात ते अपयशी ठरले आहेत. तसेच काँग्रेसमधील दिग्गज नेते मुरली देवरा आणि गुरुदास कामत यांच्या गटातटातील राजकारणामध्ये समन्वयाची दरी आणखी रुंद झाली आहे. त्यामुळे पालिकेतील काँग्रेस नेते आणि प्रदेश पातळीवरील नेते भिन्नभिन्न भूमिका मांडू लागले आहेत