ब्रिटन येथे सापडलेल्या करोना विषाणूच्या नव्या संकरावताराच्या पार्श्वभूमीवर ‘कोविड टास्क फोर्स’चे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी करोनाची उपलब्ध असलेली लस या विषाणूवर प्रभावी ठरू शकेल का अशी शंका व्यक्त केली आहे.

‘जगभरातील काही देशांमध्ये उपलब्ध असलेली करोनाची लस  विषाणूच्या नव्या संकरावताराचे स्वरूप पाहता त्यावर शंभर टक्के  मात करू शकेल असे वाटत नाही. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे संसर्ग अधिक वाढत असल्याने अशा ठिकाणी जाण्यावर मर्यादा घालायला हवी. परिस्थिती चिंताजनक असून किमान वर्षभर तरी प्रत्येकाला मुखपट्टीचा वापर करावाच लागेल,’ असे प्रतिपादन डॉ. ओक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केले.

मान्यता देण्यात आलेली लस जुन्या विषाणूच्या निरीक्षणावर तयार करण्यात आली असल्याने विषाणूच्या नव्या संकरावताराच्या तीव्रतेचा अंदाज बांधणे कठीण आहे. विषाणूच्या उत्परिवर्तनात होणारा जरासा बदलही लसीकरणासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. हा विषाणू करोनासदृश दिसत असल्याने आपण त्याला करोनाविषाणू म्हणत आहोत. परंतु त्याची घातकता वेगळी आहे. त्यामुळे नव्या विषाणूवर उपलब्ध लस कार्यक्षम ठरते आहे का याची पाहणी करावी लागेल. पुढच्या सहा आठवडय़ांनंतर एकूण परिस्थिचा अंदाज येईल, असे ते म्हणाले.

एखादी व्यक्ती करोनातून बरी झाली असेल तर ती शरीरात तयार झालेल्या प्रतिजनांवरही नव्या विषाणूचा प्रतिकार करू शकते. परंतु विषाणूचे उत्परिवर्तन एकाकडून दुसऱ्याकडे होत असल्याने पुढील काही महिने काळजी घेणे गरजेचे आहे, असेही डॉ. ओक म्हणाले.

परदेशातून १,६८८ प्रवासी मुंबईत दाखल

मुंबई : निरनिराळ्या देशांमधून बुधवारी एक हजार ६८८ प्रवाशी बुधवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून आलेल्या ७४५ प्रवाशांचा त्यात समावेश होता. त्यांची हॉटेलमधील विलगीकरणात रवानगी करण्यात आली. तर विदेशातून आलेले ६०२ प्रवाशी अन्य विमानांनी विविध राज्यांमध्ये रवाना झाले.

युरोप आणि मध्य-पूर्व देश वगळून अन्य राष्ट्रांतून आलेल्या ३३९ प्रवाशांचाही त्यात समावेश आहे.

Story img Loader