आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेसबरोबर आघाडी करून लढण्याचे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले असले तरी राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या मनात अद्यापही राष्ट्रवादीबद्दल संशयाची भावना असल्याचे चित्र पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बघायला मिळाले. पक्ष लढवित असलेल्या फक्त २६ मतदारसंघांपुरतेच नको तर संपूर्ण राज्यात लक्ष घाला, अन्यथा ऐनवेळी धावपळ होईल, असा सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी दिलेला सावधतेचा सल्ला तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नवनियुक्त सरचिटणीस गुरुदास कामत यांनी राष्ट्रवादीला मारलेले टोमणे यावरून आघाडीत अजूनही एकी नाही हेच उघड झाले.  
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारिणीची बैठक तसेच पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. आघाडीमध्ये बिघाडी होईल अशी उभय बाजूने विधाने होता कामा नयेत, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अलीकडेच व्यक्त केली होती. मात्र या मेळाव्यात अनेकांनी मित्रपक्षाला लक्ष्य करण्याची संधी साधली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाच्या आधारे आमचाच पक्ष राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते करीत असले तरी मित्र पक्षापेक्षा राज्यात काँग्रेसची ताकद जास्त असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही काँग्रेसच्या जागा वाढल्याचा दावा केला.
राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून येण्याकरिता काँग्रेसची मदत आवश्यकच लागेल, असे राष्ट्रवादीला जिव्हारी लागेल असे पद्धतीने मतप्रदर्शन गुरुदास कामत यांनी केले. राष्ट्रवादीचे आतापर्यंत बरेच सोसले पुढेही भोगण्याची तयारी ठेवा, असा खोचक सल्लाही कामत यांनी कार्यकर्त्यांना दिला. राज्यात काँग्रेसला जुने गतवैभव प्राप्त झाले पाहिजे, अशी अपेक्षा काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य आणि विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी व्यक्त केली. एकूणच वेळप्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असाच संदेश दिल्लीतून आलेल्या नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिला. राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळेल, अशा आशावाद माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
मोदी यांच्यावर टीका
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे नेमके आजच मुंबई भेटीवर असल्याने राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री चव्हाण आदी साऱ्याच वक्तयांनी मोदी यांच्यावर उत्तराखंडवरून टीका करण्याची संधी सोडली नाही. काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा भाजपचे नेते करतात, पण देशातील जनता कोणाला निवडायचे हे ठरवेल. भाजपला हे सांगण्याचा अधिकार काय, असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला. उत्तराखंडसाठी राज्यातून जास्तीत जास्त मदत देण्यावर भर देण्यात आला आहे, असेही ते म्हणाल़े
कार्यकर्त्यांचा विसर नको – राणे
पक्षाला सत्ता मिळाली त्यात कार्यकर्त्यांचे योगदान मोठे आहे. सरकार आणि जनता यांच्यात दुवा म्हणून कार्यकर्ते काम करतात. पण या कार्यकर्त्यांचा विसर पडता कामा नये यासाठी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी आत्मचिंतन करावे, असे खोड बोल उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सुनावले. शासकीय मंडळे किंवा कोणत्याही नियुक्त्यांमध्ये डावलले जाते या कार्यकर्त्यांच्या भावनेला राणे यांनी वाट करून दिली.

Story img Loader