मुंबई : दरवर्षी हिवाळा सुरू होताच नेरूळमधील पामबीच रस्त्यावरील डीपीएस तलावात मोठ्या संख्येने फ्लेमिंगोचे थवे डेरेदाखल होतात. फ्लेमिंगोंच्या आकर्षणापोटी अनेक पर्यटक आणि अभ्यासक या काळात डीपीएस तलावर परिसराला भेट देतात. त्यामुळे फ्लेमिंगोंच्या संरक्षणाची बाब लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने आता डीपीएस तलावाला कुंपण घातले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणथळ क्षेत्रात मुबलक अन्न उपलब्ध होत असल्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांचा तेथे वावर आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत नवी मुंबई ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून ओळखली जावू लागली आहे. परिणामी, पर्यटक तसेच पक्षी निरक्षकांची तेथे गर्दी वाढू लागली आहे. स्थलांतरित पक्षी बघण्यासाठी पर्यटक, पक्षी निरीक्षक तलाव परिसरात गर्दी करीत असून उडणाऱ्या पक्ष्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी काही जण त्यांच्या दिशेने दगड भिरकावतात. त्यामुळे फ्लेमिंगोंना इजा होण्याची शक्यता असते, असा मुद्दा पक्षी प्रेमींनी उपस्थित केला आहे.
डीपीएस तलावाला अर्धवट कुंपण घालण्यात आले होते. मात्र फ्लेमिंगोंची सुरक्षा लक्षात घेता ते पुरेसे नाही. त्यामुळे तलावाभोवती पूर्ण कुंपण घालावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत होती. दरम्यान, ही बाब ‘हिल ॲण्ड वेटलॅण्ड्स फोरम’च्या ज्योती नाडकर्णी आणि पर्यावरण अभ्यासक बी. एन. कुमार यांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर नवी मुंबई महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी तातडीने तलावाभोवती कुंपण घालण्याचे व सूचना फलक लावण्याचे आदेश दिले होते.
येथे लावण्यात आलेल्या सूचना फलकांकडे दुर्लक्ष करून नागरिक तलाव परिसरात फिरत होते. याबाबत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, गेल्या महिन्यात तलावाभोवती कुंपण घालण्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तलावाभोवती कुंपण घालण्यात आले, अशी माहिती बी. एन. कुमार यांनी दिली.