लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: गेले दहा महिने मुंबई विद्यापीठात प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून कामकाज पाहणारे डॉ. अजय भामरे यांची आता पूर्णवेळ प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारित अधिनियमाच्या कलम १३ (६)नुसार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने डॉ. अजय भामरे यांची प्र-कुलगुरुपदी शनिवारी नियुक्ती केली.
डॉ. अजय भामरे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पी.एचडीही संपादन केली आहे. शिक्षण क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या डॉ. भामरे यांनी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे प्रभारी अधिष्ठाता, अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अधिष्ठाता मंडळ आणि मुंबई विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर काम केले आहे. भांडुप येथील रामानंद आर्या डी.ए.व्ही महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते कार्यरत आहेत. याचसोबत त्यांनी राज्य शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समितीमध्ये आणि या धोरणाची मुंबई विद्यापीठात अंमलबजावणी करण्यासाठी विशेष योगदान दिले आहे.
आणखी वाचा-मुंबई: गोखले पुलावरून वाहतूक सुरू करण्यासाठी आता डिसेंबरचा मुहूर्त
२०१७-१८ या वर्षासाठी इंटरनॅशनल सेक्रेटरीज ऑलिम्पियाडमध्ये ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय प्राचार्य’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. याचसोबत त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे. भारतातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये एकूण गुणवत्ता व्यवस्थापनाची व्याप्ती, दक्षिण कोकणातील दोन जिल्ह्यांमधील आदरातिथ्य आणि वाहतूक सेवांचा तुलनात्मक अभ्यास, दक्षिण कोकणातील पर्यटकांसाठी सध्याच्या विपणन आणि प्रचारात्मक उपक्रमांचा अभ्यास आदी विविध विषयांवर त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत.