डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला केवळ सामाजिक विषमतेतूनच नव्हे तर कर्मकांडातून मुक्त करण्यासाठी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. मात्र अद्यापही आंबेडकरी समाज पूर्णपणे अंधश्रद्धेतून मुक्त झालेला दिसत नाही. चैत्यभूमी असो की दीक्षा भूमी, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमणारे आंबेडकरी अनुयायी गंडय़ा-दोऱ्यांनी जखडलेले दिसतात. त्याविरुद्ध आता २२ प्रतिज्ञा अभियान चळवळ सुरू झाली आहे. या वर्षी सहा डिसेंबरला आंबेडकरी अनुयायांच्या हातातील व गळ्यातील असे लाखभर गंडे-दोरे कापले गेले.
बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला अंधश्रद्धेतून मुक्त करण्यासाठी अस्सल पुरोगामी विचार दिला. बुद्धीवादाकडे व विज्ञानवादाकडे घेऊन जाणारा हा विचार सर्वच भारतीयांसाठी आहे. बौद्ध धम्माचा स्वीकार करताना त्यांनी आपल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञा दिल्या. त्यात ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, अशा काल्पनिक गोष्टी पूर्णपणे नाकारलेल्या आहेत. बौद्ध धम्माचा ज्यांनी स्वीकार केलेला नाही, परंतु स्वतला आंबेडकरवादी समजतात त्यांनाही हा विचार लागू पडतो. परंतु धर्मातरानंतरच्या गेल्या  ५७ वर्षांतील सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाचे चित्र अपेक्षाभंग करणारे आहे, हे २२ प्रतिज्ञा अभियानातून उघडकीस आले आहे.
नागपूरला दीक्षा भूमीवर किंवा मुंबईत चैत्यभूमीवर जमणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या, विशेषत अगदी सुशिक्षित व तरुणांच्या हातातील व गळ्यातील लाल-काळे दोरे पाहून अस्वस्थ झालेल्या अरविंद सोनटक्के या केंद्र सरकारच्या सेवेतील एका उच्चशिक्षित अधिकाऱ्याने त्याविरुद्ध आवाज उठविला. दीक्षाभूमी व चैत्यभूमीवर जमणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या हातातील-गळ्यातील गंडे-दोरे कापण्याची मोहीमच त्यांनी उघडली. त्यांना हळूहळू सुशिक्षित वर्गातून मोठा पाठिंबा मिळू लागला. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी आंबेडकरी अनुयायांमधील अंधश्रद्धेविरुद्ध ‘२२ प्रतिज्ञा अभियान’ ही चळवळ सुरु केली. सहा डिसेंबरला चैत्यभूमीवर जमणाऱ्या अनुयायांच्या हातातील-गळ्यातील गंडे-दोरे कापण्याची एक मोहीमच उघडण्यात आली. या वेळी सुमारे एक लाखाच्या वर असे गंडे-दोरे कापण्यात आल्याचे सोनटक्के यांनी सांगितले. या मोहिमेला त्यांनी भाग्य, आत्मा, नशीब, दैववाद, अंधश्रद्धाविरोधी चळवळ असे नाव दिले आहे. अभियानाच्या वतीने २४ डिसेंबरला वरळी येथील आंबेडकर मैदानावर सायंकाळी सहा वाजता गंडय़ा-दोऱ्यांची म्हणजेच अंधश्रद्धेची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्याला शंभर ओबीसी महिलांच्या हस्ते अग्नी देण्यात येणार आहे. अशा प्रकारे पुणे, नागपूर, नाशिक, औरंगबाद इत्यादी शहरांमध्येही भाग्य, आत्मा, नशीब, दैववाद अशा काल्पनिक व अनिष्ट प्रथा-परंपरांचे प्रतिकात्मक जाहीर दहनाचे कार्यक्रम केल्याचे त्यांनी सांगितले.