मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याच्या आरोपाप्रकरणी विविध ठिकाणी दाखल केलेले गुन्हे एकत्र करण्याच्या मागणीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानेही आव्हाड यांच्या याचिकेची दखल घेऊन राज्य सरकार आणि पोलीस महासंचालकांना मंगळवारी नोटीस बजावली व याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

आव्हाड यांच्याविरोधात रायगड आणि पुणे जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल आहेत. ते एकत्रित करण्याच्या मागणीसाठी त्यांनी याचिका केली आहे. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सरकारसह राज्याच्या पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली.

हे ही वाचा…इमर्जन्सीला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळण्याचा वाद उच्च न्यायालयात

राज्यातील प्राथमिक शाळांच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा मसुदा समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयावरून राज्य सरकारवर विविध स्तरातून टीका झाल्यानंतर, अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा मसुदा समाविष्ट करणार नसल्याचे सरकराने स्पष्ट केले. परंतु, सरकारच्या निर्णयाचा निषेधार्थ आव्हा़ड यांनी २९ मे २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तलावाजवळ आंदोलन केले. त्यावेळी, राज्य सरकारचा निषेध करताना आणि वादग्रस्त लिखाण फाडताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्रही फाडले. परंतु, आपल्याकडून चुकून हे छायाचित्र फाडण्यात आल्याचा दावा आव्हाड यांनी याचिकेत केला आहे.

हे ही वाचा…वायनाडच्या भूस्खलनामुळे सणासुदीला ‘श्रीफळ’ महाग

या घटनेनंतर, आपल्याविरोधात रायगड जिल्ह्यात दोन, तर पुणे येथील बंडगार्डन पोलीस ठाण्यात एक असे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले. ते एकत्रित करण्याची मागणी आव्हाड यांनी याचिकेत केली आहे.