करोना विषाणूविरुद्धच्या लढाईत प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देत आहे. कोणी घरी राहून, कोणी अन्नधान्याचं वाटप करून, कोणी आर्थिक मदत देऊन तर कोणी रुग्णालयात रुग्णांची सेवा करून. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी डॉ. अश्विनी अमोल कोल्हे यासुद्धा करोना विरोधात मैदानात उतरल्या आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयात त्या रुग्णांची सेवा करत आहेत.
डॉ. अश्विनी कोल्हे या केईएम रुग्णालयात २००९ पासून कार्यरत आहेत. त्या रोज सकाळी उठून घरातील कामं, दोन्ही मुलांना नाष्टा, जेवणाची व्यवस्था करून रोजच्या वेळेवर हॉस्पीटलमध्ये हजर असतात. हॉस्पीटलमधील इतर सहकाऱ्यांसोबत मिळून त्या रुग्णांची सेवा करत आहेत. डॉक्टर म्हणून ते आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. आपल्या दोन्ही चिमुकल्यांना ते लढत असलेल्या करोनाविरुद्धच्या लढाईची गोष्ट अभिमानाने सांगतात. केईएम हॉस्पीटलमध्येही अनेक रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवले असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.
दुसरीकडे लोकप्रतिनिधी डॉ. अमोल कोल्हे आपल्या मतदारसंघातील उपेक्षित घटकांना मदत मिळावी यासाठी सतत काम करत आहेत. त्याचसोबत सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे यांद्वारे ते लोकांचं समुपदेशनसुद्धा करत आहेत. आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा वापर करत आज दोघंही वेगवेगळ्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात सेवा करत आहेत.