मुंबई : मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या पॉलिटब्युरोवर राज्यातील पक्षाचे नेते डॉ. अशोक ढवळे यांची निवड करण्यात आली. माकपच्या राज्य सचिवपदी कोल्हापूरच्या डॉ. उदय नारकर यांची निवड करण्यात आली. पक्षातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या समितीवर निवड होणारे डॉ. ढवळे हे आतापर्यंतचे राज्यातील तिसरे नेते आहेत.

केरळातील कन्नूर येथील राष्ट्रीय महाअधिवेशनात पॉलिटब्यूरोवर १७ सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात किसान सभेचे अध्यक्ष व राज्यातील पक्षाचे नेते डॉ. ढवळे यांची निवड करण्यात आली आहे.

पक्षातील सर्वोच्च अशा पॉलिटब्युरोवर निवड होणारे राज्यातील डॉ. ढवळे हे तिसरे नेते आहेत. यापूर्वी राज्यातील बी. टी. रणदिवे व एम. के. पंधे यांनी पॉलिटब्युरोचे सदस्य म्हणून काम केले होते. माजी आमदार नरसय्या आडाम यांनी वयाच्या ७५ वर्षे या अटीमुळे राज्य सचिवपदावरून निवृत्ती स्वीकारली. त्यांच्या जागी राज्य सचिवपदी डॉ. उदय नारकर यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाच्या नवीन केंद्रीय समितीवर माजी आमदार जीवा पांडू गावीत आणि मरियम ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाच्या अधिवेशनात २०१८ मध्ये निघालेल्या नाशिक ते मुंबई या सुमारे ४० हजार शेतकरी व आदिवासी बांधवांच्या ऐतिहासिक लॉंग मार्चवर आधारित ‘फार्मर्स ऑन द मूव्ह’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. राज्यातील या आंदोलनाची अधिवेशनात दखल घेण्यात आल्याचे राज्य किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या धर्तीवर देशात अन्यत्रही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करावा, असा ठराव करण्यात आल्याची माहितीही डॉ. नवले यांनी दिली.

Story img Loader