डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जन्मदिनी राज्यभर उत्साहाला उधाण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीदिनी देशपातळीवरील नेत्यांनी राजकीय संधी साधण्याची धडपड चालविली असतानाच राज्याच्या कानाकोपऱ्यांत जनतेने अभूतपूर्व जलसा करून आपल्या या लाडक्या नेत्यास अभिवादन केले. मिरवणुका, सभा-मेळावे, सामूहिक बुद्धवंदना, पुस्तक-ग्रंथविक्री, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या भाऊगर्दीत डीजेच्या कानठळ्या बसविणाऱ्या तालावरील तरुणाईचा धुंद उत्साह आणि फटाक्याच्या आतषबाजीची भर पडली आणि या जयंतीला उत्सवाचेच रूप आले.
मुंबईचा कानाकोपरा गुरुवार पहाटेपासूनच भीमचैतन्याने जणू सळसळत होता. बुधवार रात्रीपासूनच ध्वनिक्षेपकांवरील भीमगीतांनी वातावरणात उत्सवी माहोल रुजविला होता. दादरच्या चैत्यभूमीला जत्रेचे स्वरूप आले होते. दुपारनंतर चैत्यभूमीवर भीमसैनिकांच्या रांगा वाढतच गेल्या. बाबासाहेबांचा विचार आणि आचारांचा वारसा जपणारी पिढी अशा सोहळ्यातून तयार व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या बुजुर्गाचे नाराजीचे सुस्कारे मात्र या ढणढणाटात कुणाच्या कानावर गेलेच नाहीत. राजकीय नेते, आंबेडकरी चळवळीचे आपापले झेंडे खांद्यावर घेऊन अनुयायांचे गटतट जपणारे नेते आणि त्यांच्या पाठीराख्या कार्यकर्त्यांचे स्वतंत्र तंबू गुरुवारीही दिसतच होते. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करणाऱ्या कमानी जागोजागी उभ्या राहिल्या होत्या. मुंबई, नागपुरात तर गल्लोगल्लीचे वातावरण निळ्या झेंडय़ांनी आणि भीमगीतांच्या सुरांनी भारावल्यासारखे झाले होते. बॅनरबाजीवरील र्निबध झुगारून उभ्या राहिलेल्या फलकांवर गटातटांच्या नेत्यांमध्ये आपापल्या प्रतिमा झळकावण्याची जणू जोरदार स्पर्धा दिसून आली. ढोलताशांचा गजर, रस्तोरस्तीच्या मिरवणुकांतील नृत्यात सहभागी तरुणांचा धुंद जल्लोष असेच अनेक ठिकाणी या उत्साहाचे स्वरूप होते. नागपुरात विविध ठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुका मॉरिस चौकात एकत्र आल्यानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून काहींनी केक कापून जयंतीचा सोहळा साजरा केला.
उपेक्षित, वंचितांना सन्मानाने जगण्याची दिशा देणाऱ्या आपल्या नेत्याच्या १२५ व्या जयंतीदिनाच्या सोहळ्यास राजकीय पक्ष व संघटनांमुळे उत्सवी भपकेबाज रूप आल्याचे पाहून आंबेडकरी चळवळीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी व आंबेडकरी अनुयायांनी नापसंती व्यक्त केली. मात्र, त्यांचे मानवतेवरील ऋण वर्गभेद विसरून संपूर्ण समाजाने आता मान्य केल्याची पावती मात्र या सोहळ्यातून मिळाल्याचे समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर उमटले होते.
दुपारची उन्हे काहीशी कलली आणि आकाशात एक हेलिकॉप्टर घिरटय़ा घालू लागले. काही वेळातच बाबासाहेबांचे स्मारक असलेल्या चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सुरू झाली आणि बाबासाहेबांच्या जयघोषाने दादर चौपाटीचा परिसर दुमदुमून गेला. संध्याकाळी बाबासाहेबांचे निवासस्थान असलेल्या राजगृहापासून चैत्यभूमीवर निघालेल्या मिरवणुकीत सहभागी होऊन असंख्य भीमसैनिकांनी या महामानवास मानवंदना दिली.

Nagpur people excited about New Year house party
नववर्षाच्या ‘हाऊस पार्टी’ची नागपूरकरांना हौस…
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
thane farmhouses party loksatta news
सुट्टी नसल्यामुळे जवळच्या ठिकाणी नववर्षाचे स्वागत करण्यास तरुणांची पसंती; कर्जत, लोणावळा, माथेरान मधील शेतघरांमध्ये आगाऊ नोंदणी
After 12 years the alliance of Jupiter and Moon will brighten the fortunes of 4 zodiac signs dreams will be fulfilled in 2025
१२ वर्षांनंतर गुरू आणि चंद्रच्या युतीने ४ राशींचे भाग्य उजळणार, २०२५मध्ये स्वप्न होतील पूर्ण, घर-वाहन खरेदीचा निर्माण होईल योग
Yearly Horoscope 2025 in Marathi
Rashifal 2025: मेष ते मीन राशींसाठी कसे असेल नवीन वर्ष २०२५! जाणून घ्या १२ राशींचे वार्षिक राशीभविष्य
Surya Grahan 2025 And Shani Gochar
१०० वर्षांनंतर निर्माण होणार शनी गोचर आणि सुर्य ग्रहाचा संयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरु होईल सुवर्णकाळ, करिअर आणि व्यवसायात मिळेल यश
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना नवीन वर्षात होईल आर्थिक लाभ, मिळणार दुप्पट पैसा
Story img Loader