‘जनता’ या साप्ताहिकातून केलेले लिखाण अद्याप अप्रकाशित
विविध अभ्यासशाखांमधून मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करीत मानवमुक्तीची चळवळ उभारणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित चळवळ ऐन भरात असताना ‘जनता’ या साप्ताहिकातून केलेले लिखाण अद्याप प्रकाशित न झाल्याने गेली ५० वर्षे धूळ खात पडून आहे. त्याचे योग्य प्रकारे जतन करण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आता तर हे विचारधन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
राज्य सरकारने डॉ. आंबेडकरांचे सर्व साहित्य प्रकाशित करण्याचा निर्णय १९७८ साली घेतला. त्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती’ची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत समितीकडून डॉ. आंबेडकरांच्या भाषणांचे व लेखनाचे २२ खंड प्रकाशित करण्यात आले आहेत. यातील वीस खंड इंग्रजी भाषेत आहेत. १९८७ पासून त्यांचा मराठी अनुवाद करण्याचेही काम समितीने हाती घेतले आहे. याशिवाय आणखीही जवळपास ३० खंड प्रकाशित होतील एवढी साधने उपलब्ध आहेत. परंतु, ‘जनता’तील साहित्याचे प्रकाशन मात्र रखडलेलेच आहे.
डॉ.आंबेडकरांनी लिहिलेल्या साहित्यात त्यांच्या ग्रंथांबरोबरच तत्कालीन नियतकालिकांमध्ये त्यांनी वेळोवेळी केलेले लेखनही तितकेच महत्त्वाचे आहे. यातील ‘बहिष्कृत भारत’, ‘मूकनायक’ या नियतकालिकांमधील त्यांचे लेखन या खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. परंतु, १९३० ते १९५५ या काळात प्रकाशित झालेल्या ‘जनता’ साप्ताहिकातील लेखन मात्र अद्याप प्रकाशित करण्यात आलेले नाही. डॉ.आंबेडकर व भारतातील दलित चळवळ यांच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे साधन असलेल्या जनता साप्ताहिकातील साहित्याचे प्रकाशन करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र अद्याप त्याच्या प्रकाशनासाठी कोणतीही पावले उचलली न गेल्याने याविषयी जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे जनता साप्ताहिकाच्या पंचवीस वर्षांतील अंक सध्या दुर्मीळ झाले असून सरकारच्या प्रकाशन समितीकडेही त्यांचा संग्रह नाही. आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक वसंत मून यांनी नागपूरमध्ये सुरु केलेल्या ग्रंथालयाकडे जनताचे अंक आहेत, परंतु त्यांची स्थिती खूपच खराब आहे. तसेच आणखी काही जणांकडे असलेले जनताचे तुरळक अंकही वाळवी तसेच इतर कारणांनी खराब होण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे दलित चळवळीच्या महत्त्वाच्या कालखंडाचा दस्तावेज असलेल्या जनतामधील साहित्याचा दुर्मीळ ठेवा आता नामशेष होतो की काय, अशी भीती आंबेडकरी कार्यकर्ते, अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारने प्राधान्याने हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत व त्याचे प्रकाशनही किमान या १२५ व्या जयंती वर्षांत करावे, अशी मागणीही अनेकांकडून करण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा