मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मीळ पत्रे, लेख व दस्तऐवजांचे मुंबई विद्यापीठाने जतन केले असून ही पत्रे, लेख, दुर्मीळ पुस्तके १४ एप्रिलपर्यंत पाहता येणार आहेत. महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले मुंबई विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू ज्ञान स्त्रोत केंद्राच्या नवीन इमारतीत दुर्मीळ पुस्तके, दस्तावेजांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत सर्वांसाठी खुले आहे.
हेही वाचा : पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरण : सिंधुदुर्गातील १८०७ एकर जमिनीवर ईडीची टाच, जमिनीची किंमत ५२ कोटी ९० लाख रुपये
या प्रदर्शनात १५० हून अधिक पुस्तके, दुर्मीळ लेख, रविवार ३ एप्रिल १९२७ चा बहिष्कृत भारत पाक्षिकाचा पहिला अंक, मूकनायक, जनता साप्ताहिकाचे ऑक्टोबर १९५६ चे हिरक महोत्सवी विशेषांक, २७ ऑक्टोबर १९५६ चा प्रबुद्ध भारतचा अंक, डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली विविध पत्रे, भारतीय संविधानाच्या मसुद्याची प्रत आदी गोष्टी पाहता येतील. याशिवाय संयुक्त जयंती सप्ताहामध्ये समुह चर्चा, कवी संमेलन, प्रश्न मंजूषा, चर्चासत्रे, अभिवादन, गीत गायन, नाटक आणि शाहिरी जलसा आदी कार्यक्रम होणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जयंती सप्ताह कार्यक्रमाच्या निमंत्रक प्रा. मनिषा करणे, ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. नंदकिशोर मोतेवार आदी उपस्थित होते.