मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्यावतीने दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक, ‘राजगृह’ येथील निवासस्थान आणि संबंधित परिसरांमध्ये विविध प्रकारच्या नागरी सेवा–सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्युब या समाज माध्यम खात्यावरुन थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच, फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर) या माध्यमांवरुन सहप्रक्षेपण करण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादरस्थित चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक येथे उद्या सोमवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी ९.३० वाजता पुष्प अर्पण करून अभिवादन करतील.
या पार्श्वभूमीवर, विविध प्रकारच्या नागरी सोयी–सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. उपआयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांच्या देखरेखीखाली विविध स्तरीय कार्यवाही करण्यात आली आहे.
चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक तसेच परिसरामध्ये नियंत्रण कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, शौचालये आदी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच सीसीटीव्ही, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी, अग्निशमन दलाचे पथक तैनात करण्यासह अग्निशमन सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरेशा संख्येने नेमण्यात आलेले आहेत. अणीबाणीच्या प्रसंगी तात्काळ मदतीसाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली आहे.
डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे करण्यात आले आहे. या प्रदर्शन दालनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासातील दुर्मिळ छायाचित्रे असणार आहेत. त्याचबरोबर या प्रदर्शन दालनात, संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक जीवनचरित्रावर आधारित कॉफी टेबल बुक देखील विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.