मुंबई : वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या पादुकादर्शन सोहळ्यात संतांच्या यादीत डॉ. बालाजी तांबे यांचा समावेश करण्यात आला आहे. संतांच्या यादीत तांबे यांचा समावेश कसा होऊ शकतो, असा प्रश्न वारकरी संप्रदायातून उपस्थित करण्यात येत आहे.

भक्ती शक्ती व्यासपीठ आणि श्रीगुरू पादुकादर्शन उत्सव यांच्या वतीने वरळी येथे दोन दिवसीय संत आणि योगी पुरुषांच्या मूळ पादुका दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर (नेवासा), संत तुकाराम (भंडारा डोंगर), संत मुक्ताई (मुक्ताईनगर), संत नामदेव (घुमान, पंजाब), संत जनाबाई (गंगाखेड), संत रामदास, संत गजानन महाराज, संत गोंदवलेकर महाराज यांच्या बरोबरीने डॉ. बालाजी तांबे यांच्या पादुकांचा समावेश करण्यात आला आहे. त्याबाबत वारकरी सांप्रदायातून तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.

भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज म्हणाले, ‘संतांच्या पादुकांच्या यादीत बालाजी तांबे यांच्या पादुकांचा समावेश करणे चुकीचे आहे.

आळंदी देवाची येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ म्हणाले, ‘पादुकादर्शन उपक्रम स्तुत्य आहे. पादुकादर्शन सोहळ्याच्या आयोजकांनी स्वत: चिंतन करावे. महाराष्ट्राची संतपरंपरा फार मोठी आहे. कोणाच्या पादुका ठेवाव्यात आणि कोणाच्या पादुका ठेवू नयेत, याचा निर्णय आयोजकांनी घ्यावा. संत आणि सत्पुरुष यांच्यात फरक आहे. आपण संत आणि सत्पुरुष यांच्यातील सीमारेषा पाळली पाहिजे. वारकरी संप्रदायातील परंपरेनुसार संत निळोबाराय महाराज यांच्यापर्यंतच संतपरंपरा आहे.’

बालाजी तांबेंविरोधात यापूर्वी तक्रार

‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकाच्या माध्यमातून पुत्रप्राप्तीचा प्रचार करून गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी अहिल्यानगर जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पुस्तकाचे लेखक बालाजी तांबे, प्रकाशक आणि विक्रेत्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या समितीने दिलेल्या अहवालानंतर बालाजी तांबे यांच्यावर पुत्रप्राप्तीचा प्रचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पुत्रप्राप्तीचे उपाय सुचवून लिंगनिवडीबाबतचा तांबे यांचा हेतू आहे, हे पुस्तकातून सिद्ध होत असल्याचे समितीने म्हटले होते.

महाराष्ट्रातील संतपरंपरा फार मोठी आहे. ज्ञानेश्वरांपासून गाडगे महाराजांपर्यंत सर्वांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यांच्या रांगेत बालाजी तांबेंना बसवणे अतिशय दुर्दैवी आहे. श्याम मानवसंस्थापक, अ. भा. अंनिस

Story img Loader