आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रणीत सोई हे शांतपणे काम करणारे दृश्यकलावंत. कलाकृतीमागचा त्यांचा विचार इतका सखोल असतो की, समोर मानवाकृतीच दिसत असूनसुद्धा त्या चितारण्यामागचा विचार अस्फुटच नाही ना राहात, असं प्रेक्षकाला वाटावं. पण कामामागच्या विचाराबद्दल थोडी माहिती मिळाल्यावर तो अस्फुटपणा नाहीसा होतो. नेमका हाच अनुभव सध्या भायखळ्याच्या राणीबागेच्या प्रवेशदाराशीच असलेल्या ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’मध्ये येतो आहे. श्रमगाथा हा प्रणीत यांच्या या प्रदर्शनाचा विषय. तो विविधांगांनी खुलवताना त्यांनी श्रमिकांच्या हालचालींपासून ते त्यांची ‘रोजीरोटी’ असलेली अवजारं, त्या साधनांमध्ये गुंतलेलं त्यांचं विश्व, श्रमिकांच्या श्रमांतून प्रणीत यांच्यासारख्या चित्रकाराला होणारी कलाजाणीव.. या साऱ्याचा विचार केलेला दिसतो. त्यातून तयार झालेल्या कलाकृतींपैकी दोन ‘पाहिलेल्यांच्या लक्षात राहाव्यात’ आणि ‘न पाहिलेल्यांनी आवर्जून पाहाव्यात’ अशा आहेत.

यापैकी पहिल्या कलाकृतीत एका श्रमिकाच्या एकाच कृतीत केवढय़ा हालचाली असतात, हे दाखवणाऱ्या रेखाटनांची सचेतपटासारखी माळ आहे. तर दुसरी कलाकृती प्रदर्शनाच्या केंद्रस्थानीच असून ती श्रीनगर (काश्मीर) येथील श्रमिकांसह काम आणि अभ्यास करून प्रणीत सोई यांनी साकारली आहे. फरशी आणि त्यावर कुठेकुठे बारीक डिझाइन (नक्षी) असं या कलाकृतीचं बाष्टय़रूप दिसलं; तरी तिच्यातले बारकावे अनेक आहेत. फरशी आहे देशभर कुठेही भ्रष्टाचाराचं प्रतीक म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या ‘पेव्हर ब्लॉक’ सारखी .  त्यावरलं डिझाइन म्हटलं तर पारंपरिक; पण ते ‘इथे आणि आत्ता’ केलेलं दिसत असल्यामुळे, त्या काश्मिरी ‘कारागीर’ श्रमिकांनी देहभानही विसरून हे जे नक्षीकाम घडवलं, त्यामागच्या ( यावनी ) इतिहासाचं भान तरी त्यांना उरलं असेल का ? त्या नक्षीच्या इतिहासातून निपजणारं राजकारण हे त्यांचं आजचं राजकारण असू शकतं का? यासारखे ( आपल्याला ज्यांची उत्तरं नकोशीच वाटतील, असे ) प्रश्न उद्भवू शकतात.

प्रणीत यांचं एकंदर प्रदर्शन हे अशा नकोशा प्रश्नांची नक्षीच मांडणारं आहे , हेही त्याच वेळी लक्षात येतं . असंघटित श्रमिकांकडे पाहण्याची आपली नजर अधिक आपुलकीची होण्यासाठी ही नक्षी आवश्यकच आहे , हेही एका बाजूनं प्रेक्षकाला पटत असतं !

इंग्रजी व हिंदीखेरीज  मराठीतही कलाकृतींबद्दल माहिती देणारं हे प्रदर्शन २५ जुलैपर्यंत सुरू आहे .

त्यासोबत, मुंबईतल्या मूळच्या कोकणवासी कुटुंबांचा अभ्यास करून त्यांची सद्य्स्थिती, त्यांचं गावाशी असलेलं नाते यांचं चित्रण करणारं ‘मुंबई रिटर्न’ हे  प्रदर्शन याच संग्रहालयाच्या मागल्या बाजूस ‘प्रोजेक्ट स्पेस’मध्ये ३१ जुलैपर्यंत सुरू आहे .

जहांगीरमधलं शैलीवैविध्य

जहांगीर आर्ट गॅलरीच्या ‘सभागृह दालना’ दर पावसाळय़ाप्रमाणे यंदाही कुणा राज्याच्या हस्तकलावस्तूंचं विक्रीपर प्रदर्शन भरलं आहे. पण एकापाठोपाठ एक असलेल्या तीन दालनांत चित्र-शिल्पांचं आधुनिक शैलीवैविध्य दिसतं आहे. मुंबईचे चित्रकार मनीष सुतार यांच्या प्रदर्शनात मुंबईच्या ‘बेस्ट’ (बीईएसटी) बसची तिकिटं, बसगाडय़ांमधली आसनव्यवस्था असे दृश्यसंदर्भ येतात. त्यांनी कुठेही बसगाडीचं चित्र काढलेलं नाही, हे विशेष. मग हे तिकीट कशासाठी? आसनं कशाला? याचं उत्तर असं की, ते आकार मनीष यांच्या चित्रांमध्ये प्रतीक म्हणून येतात. तिकीट हे एखाद्या कालखंडाचं, एखाद्या स्थित्यंतराचं म्हणजे या अवस्थेपासून त्या अवस्थेकडे झालेल्या प्रवासाचं, किंवा आयुष्याचंही प्रतीक असू शकेल.. आसनं हे अगदी सत्तेचंही प्रतीक असेल, किंवा ‘निवांततेची जागा’ या अर्थानं घराचंही. ते अर्थ अमूर्तच ठेवून आकार, रंग आणि नजरेत भरेल अशा अवकाशाचं दर्शन घडवणारी चित्रं मनीष सुतार यांनी केली आहेत. काही चित्रांवर मुंबईतल्याच एका (घाटकोपरवासी!) चित्रकाराच्या शैलीशी साधम्र्य दिसतं. समकालीन वर्णनात्मक शैलीच्या शोधात असणाऱ्या मुंबईकर चित्रकारांना हे शैलीवैशिष्टय़ टाळता येणारच नाही बहुधा, असंही असावं. पण तिकिटाच्या आकारावरली चित्रं यापेक्षा वेगळी ठरतात.

पुण्याचे संदीप छत्रबंद यांची चित्रं अ‍ॅक्रिलिक रंगांत असली, तरी त्यांची शैली पारदर्शक व अपारदर्शक जल-रंगांमध्ये केलेल्या निसर्गचित्रणासारखी आहे. या प्रदर्शनातल्या दोनच (पहिल्या आणि शेवटच्या) चित्रांत त्यांनी पारदर्शक जलरंगांसारखं काम अ‍ॅक्रिलिकनं केलं आहे. बाकीची चित्रं अपारदर्शक जलरंगांत (पोस्टर कलरमध्ये) रंगवल्यासारखी दिसतात. त्यापैकी अनेक चित्रांमध्ये प्रकाशाची दिशा दाखवण्यासाठी मारलेले पांढरे छोटे फटकारे, हे तर पोस्टर कलरचा भास आणखीच वाढवतात. बनारसच्या घाटांची चित्रं सहसा इंप्रेशनिस्ट शैलीनं, भरपूर रंगांचे छोटे आणि जाडसर फटकारे वापरून करण्याची पद्धत रूढ आहे; त्यापेक्षा ही सपाट रंगलेपनातली चित्रं निराळी ठरतात हे नक्की. ही चित्रं ‘जहांगीर’च्या तिसऱ्या वातानुकूलित दालनात आहेत, तर त्याआधीच्या दालनात कर्नाटकातील शशिकांत पाटील यांची भौमितिक आकारांचा वापर असलेली वृषभ-चित्रं, संगमेश चिल्लीशेट्टी आणि चंद्रहास वाय. जे. यांची विविध दैनंदिन विषयांवरली चित्रं, नागप्पा प्रधानी यांची धातुशिल्पं आणि निंगप्पा कैरी यांनी काळ्या पाषाणात तसंच लाकडातून घडवलेली शिल्पं यांचं एकत्रित प्रदर्शन भरलं आहे. हे सारे चित्र-शिल्पकार वयानं ज्येष्ठत्वाकडे झुकलेले, तरुणपणापासून ‘आधुनिकते’चा ध्यास घेतलेले असे आहेत, असं त्यांच्या कलाकृती सांगतात. एकोणीसशे साठच्या दशकापासून आधुनिक कलेच्या भारतीय अवतारांमधून जे आकार, जे विषय दिसत आले, त्यांचा पुन:प्रत्यय या प्रदर्शनातून येत राहातो. विशेषत: पाटील, चिल्लीशेट्टी आणि प्रधानी यांची कामं या प्रत्यय देतात. चंद्रहास यांच्या जरा मोठय़ा चित्रांमधून विषयापेक्षा मांडणीला अधिक महत्त्व, विरोधी रंगांचा वापर, कमान किंवा तत्सम ‘फोरग्राऊंड’च्या मागे मुख्य दृश्य दाखवणं, पुढे असलेला भाग (फोरग्राऊंड) आणि तुलनेनं मागे असलेला भाग या दोन्हींचं सपाट रंगांतच चित्रण अशी आणि काहीशी स्वयंशिक्षितपणाकडे झुकणारी शैली दिसते खरी, पण चंद्रहास यांचीच जी लहान आकाराची चित्रं शेजारच्या भिंतीवर आहेत, ती पाहून त्यांच्यावरही चित्रगत आधुनिकतेचं गारूड कायम असल्याची खात्री पटते.

ही सर्व प्रदर्शनं येत्या सोमवापर्यंत (१० जुलै) खुली आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr bhau daji lad museum art museum