डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जाण्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण चळवळीला मोठा धक्का बसला आहे. त्यांची प्रबोधनात्मक लढाई ‘अंधश्रद्धा विरुद्ध बुद्धिप्रामाण्यवाद’ अशी होती. चळवळी अस्तंगत होण्याच्या काळात कार्यकर्त्यांची मोट बांधून चळवळ यशस्वीपणे पुढे नेणे आणि समाजाशी जोडलेली नाळ तुटू न देणे हे त्यांचे वैशिष्टय़ होते. त्यांच्या हत्येने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.  ते स्वत: पुरोगामी होतेच पण महाराष्ट्र पुरोगामी आहे का, असा सवाल आता केला जात आहे. तर दुसरीकडे संवेदनशील नागरिकांना कृतिशील होण्याच्या जबाबदारीची जाणीवही करून दिली जात आहे. या पाश्र्वभूमीवर चार मान्यवरांनी केलेली ही चिकित्सा..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओ, महाराष्ट्र! मला बोलावंसं प्रकर्षांनं वाटल्यामुळं हे लिहितोय. खरं म्हणजे बोलायचंय. लिखाणासाठी आवश्यक ‘विचार’ कदाचित कमीच आहे. ओतप्रोत मेलोड्रॅमॅटिक भावनेनं व्याकूळ अन् उन्मादी, आळशी, भीतीग्रस्त, सुखलोलुप, कूपमंडूक आणि आत्मरत बोलघेवडा असल्यानं हा समाज मला आपलं मानतो आणि त्या आपुलकीनं तो हे लिखाण वाचेल अशी खात्री वाटते. माझे इतरही अनेक गुण लोकप्रिय आहेत, पण आता ते औचित्य नाही. (उदा. राजकीय असंवेदनशील, अहंकारी, जात्याभिमानी.. बरेच आहेत.)
तर बरं का!
माझ्या मुलीला (मला माहीत असलेली) ‘शल्य’ राजाची गोष्ट सांगत होतो. जाणीवपूर्वक, पूर्वनियोजित राजकारणाचा भाग म्हणून आणि वैयक्तिक जातीय अस्मिता आणि ‘सूतपुत्राला रथ हाकावा लागल्यानं जागा झालेला क्षात्रधर्माभिमान याचं ‘शल्य’ कर्णाचा रथ स्वकियांच्या रक्तमांसाच्या चिखलात रुतवूनही जनावरांसह (घोडे) निघून गेला. (गोष्टीतले दोष दाखवून, महाराष्ट्रातील विद्वानांनी पत्रे लिहिण्यात स्वयंउत्सर्जन करू नये. मी कवडीमोल माणूस. मला अनुल्लेखानेच मारावं हे बरं)
तर हे मी लिहितोय त्यामुळे ती माझीच मतं आहेत. मला अजून तरी सगळ्यांनी सामान्य नागरिकच ठेवलंय. नाही म्हणायला सगळ्या तलवारींची धार एकत्र करून, सगळी सूत्रं एकेका गाठीनं जोडीत क्षीरसागर लांघू बघणाऱ्या ज्ञातीबांधवांच्या सुताच्या पुलावर वार करण्याची योजना आखणारे माझे ‘क्षात्र’ मित्र मला विचारणा करून झाले आहेत, की ‘येतोस का आमच्यात?’ सगळ्यांना मी त्यांच्यात हवा असतो यात माझी कोणतीही मर्दुमकी नसून संख्या वाढते हा उद्देश आहे. मग मी नक्की कोण आहे, असा मला प्रश्न पडतो? मला सगळेच आवडतात (आणि मीही सगळ्यांना आवडतो) अशी माझी सोयीस्कर भाबडी समजूत आहे. हे असं का? मी एक संख्या आहे का? एक आकडा टीआरपी १३, ३७, ९१७ येस! युरेका, युरेका!
म्हणजे बघा हं, मला काय वाटतं, की १५० वर्षांच्या पारतंत्र्यामुळे जो आनुवंशिक बुळेपणा माझ्यात आलाय तो मला संख्येत, गर्दीत रूपांतरित करतो आणि एकदा संख्येचा भाग झाला की स्वतंत्र वाटतं! जबाबदारी येत नाही आपल्यावर (एक डोळा मारणारा स्माईली!) काहीही करायचं! पुस्तकं फाडायची, विटा जमावायच्या, गोळ्या घालायच्या, बलात्कार करायचे, बक्कळ पैसा खायचा, त्या पैशांतन् शोषण करायचं आणि आपली स्वत:ची म्हणून छोटी संख्या तयार करायची. त्याचे आपण राजे! किंवा दादा! अगदी साहेबसुद्धा! आणि आपलीच असल्यानं त्यांच्यावर कशीही सत्ता गाजवायची अगदी बिनडोकपणे!! मज्जा!!
मग मला ह्य़ा सगळ्या संख्येचा वीट येतो. त्यापासून तुटायची भावना अगतिक करते. संताप येतो, कारण माझे पाय मातीचे आहेत. डोक्यावर परिणाम झाल्यासारखं लिहितोय, कारण तो झालाच आहे. असं प्रच्छन्नपणे वृत्तपत्री लिखाण न करण्याचा संकेत मी पायदळी तुडवीत असेन तर तेवढं तरी करूच द्या.
शांत व्हावं लागेल. शांतच व्हावं लागेल, आणि हो! शांतच व्हावं लागेल. तरच हा बुळेपणा जाऊन जबाबदार होण्याकडे पहिलं निर्भय पाऊल टाकता येईल. श्वासावर लक्ष एकवटलं पाहिजे. अविचार ही केवळ जैवरासायनिक प्रक्रिया आहे. भावनांवर ताबा मिळविणारं माझं अध्यात्म विज्ञाननिष्ठ आहे. तेच बळ देईल. मला अपारंपरिक ऊर्जास्रोत शोधावे लागतील. काही जनित्रं मला दिसतात. ती सगळी जुनी आहेत पण त्यांची बांधणी मजबूत देशी तंत्रज्ञानावर आधारित झाली आहे. या मातीला हे तंत्रज्ञान साहवणारं, फुलवणारं आहे. अशात जर कुणी जास्त अंधार करून मोठय़ा ऊर्जेची गरज निर्माण करीत विदेशी, पर्यावरणमारक (सामाजिक, आर्थिक सगळंच) तंत्रज्ञान जर आणू पाहील तर त्यास ‘एत्तदेशीय’ स्थानिक तंत्रज्ञानातून उभा केलेला आणि अपार कार्यक्षमतेच्या जनित्र निर्माणाचं उत्तर द्यावं लागेल. असे प्रयोग बंद पाडले जातील, पण गुपचूप प्रत्येक जण जर स्वयंऊर्जा तयार करील तर अशा तात्कालिक व्यापारी आक्रमणाला उत्तर शोधता येईल. नव्हे, ते शोधलंच होतं डॉक्टरांनी. या समाजाला ऊर्जेची नितांत गरज आहे. त्याच्या विकासाचा प्रचंड अनुशेष आहे. पण कूपमंडूक, अविज्ञानवादी, अनुकरणप्रिय राजसत्ता ब्रिटिशांनी स्वार्थासाठी शोधलेली साधनंच वापरीत आहे. इतकं, की फोडा आणि राज्य करा, समाज साक्षर करा, पण शिक्षणातून संवेदना बोथट करा. स्वयंप्रज्ञा, स्वयंप्रेरणा अशा गोष्टी आनुवंशिकतेत नष्ट करा. ही आणि अशीच जुनी सूत्रं राबवून नवे साहेब, दादा, अण्णा, भाऊ, सम्राट तयार होताहेत.
किती अवघड आहे! सगळं एकमेकांत गुंतलं आहे. गुंतवलं जातं आहे. संभ्रम तयार केले जात आहेत.कम्युनिकेशन क्रायसिस आहे. शब्दांचे निराळे अर्थ लावले जात आहेत. पण हे सगळं सगळं होतंच डॉ. नरेंद्र दाभोलरांच्या बाबतीत. मग कसं काम उभं केलं त्यांनी? का मिळते मला त्यांच्या विचारांतून ऊर्जा? (आणि हो, भौ महाराष्ट्र, मला देव आवडतो बरं का. आणि माझ्या या अडाणीपणालाही डॉक्टरांचा विरोध नव्हता. अर्थात, मी तो मूर्तिरूपानं विसर्जित केलेला आहे.) मला वाटतं ‘अँग्री यंग मॅन’चं निष्क्रिय तत्त्वज्ञान मधल्या स्थिरतेच्या काळात या देशात रुजलं. सगळे स्वकीयच होते पण काही जे दुर्जन होते त्यांना तो AYM ठोकीत असे. पाहणारे टाळ्या मारीत. अशात काळाबरोबर वाहात आलेले, नव्यानं तयार होणारे प्रश्न होतेच, पण AYM होता ना. तो सोडवतो प्रश्न; आपण फक्त टाळ्या मारायच्या, ह्य़ा मानसिकतेत पुढे कुणीच AYM  होईना. तरीही आम्ही ह्य़ाला त्याला AYM  करीत समजूत काढीत राहिलो, टाळ्या पिटीत राहिलो.  शास्त्रीय परिभाषेत सामाजिक प्रश्नाकडे बघण्याची ही नॉन पॉप्युलर परंतु वाहती परंपरा होतीच. डॉ. दाभोलकरांनी हीच परंपरा वाहती ठेवली, वाढवली. स्वार्थ त्यागून त्यांनी स्वत:ला प्रथम निर्भय करून घेतलं. (ओतप्रोत मेलो.. समाजाशी संवाद साधणारी शब्दकला आणि भाषेला नवा अन्वयार्थ, शब्दाचा नवा भावार्थ आचरणातून रूढ करण्याचा प्रयत्न केला.) दाभोलकर दोन स्वतंत्र मूलद्रव्यांना एकत्र आणून त्यांचं गुणवर्धन करणारं संयुग करू पाहात होते आणि यासाठी त्यांनी संप्रेरकाची दुय्यम समन्वयवादी भूमिका घेतली होती. मला AYM व्हायचं नाही, पण मला टाळ्या मारीत बसायचं नाही. मला गणितं सोडवायचीच आहेत. प्रयोग सिद्ध करण्यात मला रस आहे. त्यासाठी, बॅकस्टेजचं महत्त्वं वाढवावं लागेल. अनसंग का काय तसं होण्याची धडपड करावी लागेल.
अनेक दाभोलकर आजूबाजूला आहेत. बहुसंख्य तर त्यांनीच निर्माण केले आहेत. नारळीकरांची जनित्रं आहेत, बंगांची आहेत, आमटय़ांची आहेत, अवचटांची, मेधा पाटकरांची, बाबा आढाव, सदानंद मोरे, पार्थ पोळके , राजन खान, नीलिमा मिश्रा, डॉ. मोहन आगाशे, डॉ. गो. पु. देशपांडे, डॉ.  लागू , शेट्टी, खोत; वाचून दमून मराल एवढी शोधलीयत मी नावं या दोन दिवसांत. ही जनित्रं जोडावी लागतील. Energy Restoration in Recycling चा दाभोलकर एक्सपेरिमेंट करीत राहावं लागेल. नेत्यांनी आचार-विचारांनी कार्यकर्ताच राहावं लागेल (नेता व्हायला SUV आणि फ्लेक्स लागतात ही समजूत मेधा पाटकर, आढाव, मोरे प्रभृतींच्या सेलिब्रेशनमधून खोडून काढावी लागेल. हे सगळं माझ्यासाठी लिहितोय. ज्यांना पटणार नाही त्यांनाही माझ्यातला कॉम्रेड उद्याचे स्वयंसेवक मानून जवळ करणार आहे. माझ्या सेलिब्रिटीज बदलणार आहेत. Virtual fiction  मधून मन रमविण्याऐवजी सज्जड भौतिक कृती करणार आहे. पायाने चालणार आहे. माती स्पर्शणार आहे. मी स्वयंप्रेरणेने सर्वाशी संवादी होणार आहे. उत्तम श्रोता होणार आहे. असो. मी बरंच ठरवलं आहे. सगळंच तुम्हाला पटेल असं नाही. तुम्ही तुमचं शोधा, पण डोक्यातली बुद्धी वापरा म्हणजे तुमची तुम्ही वापरा. कुणा मठाधिपती वा बुवाला वापरू देऊ नका. 

दाभोलकरांच्या हत्येनं आलेल्या हतबलतेतून मी विकारी होणार नाही. नेता पडल्यावर पळ काढण्याची खास पानिपती परंपरा विसरून मरेपर्यंत लढणारा दत्ताजी शिंदे अन् शेलारमामाचा वारसा आठवावा लागेल. सहसंवेदना आणि सद्विचारांनी शस्त्रसज्ज व्हावं लागेल. मला दिसते तेवढीच सृष्टी हा संकुचित विचार टाकण्याची ही ऐतिहासिक संधी दाभोलकर सरांच्या बलिदानातून तयार झाली आहे. Energy Can never be destroyed. it Changes its form. दाभोलकरी ऊर्जेचं समाजऊर्जेत रूपांतरण होत आहे. त्या विचारानं धीर धरावा लागेल. स्वार्थ टाकून समाज चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निर्धारावरचा हा हल्ला काही समविचारी करुणांना एकत्र आणतो आहे. आणि जे कुणी विरोध करणारे श्रद्धाळू आहेत, त्यांच्याशी त्यांच्या पिस्तुलासकट प्रकट संवाद करण्याची तयारी निर्माण करतो आहे. ‘देव’ही धंद्याला लावून पैसा करायच्या विरोधातला दाभोलकरांचा विचार किती सश्रद्ध करणारा आहे हे मांडायचा मी प्रयत्न करायला माझ्यासारखे अनेक तयार आहेत. चला, बोलू या एकमेकांशी; अगदीच नाही पटलं तर गोळी घाला खुशाल. तुमचं ते स्वातंत्र्य मान्य करायला मला दाभोलकर सरांनी शिकवलं आहे.
 सहा-सात वर्षांपूर्वी ब्रेन हॅमरेज झालेल्या वडिलांच्या मृत्यूला मी कन्सेन्ट दिला होता. तेव्हा आलेली हतबलता मी  पुन्हा अनुभवली, अन् बाप मेल्यावर जबाबदार होण्याची किंमत चुकविली. पण आता बास, मी अशा कोणत्याही विनाकारण मृत्यूला कन्सेन्ट देणार नाही. चला, बाहेर पडू ! एकमेकांचं सांत्वन करू अन् कामाला लागू!
ता. क. एक राहिलंच गोष्टीचं तात्पर्य .. अं?
जाऊ द्या, मी नाही सांगत. तुम्ही तुमचं शोधा, नाहीतर आदरणीय मुख्यमंत्र्यांना विचारा; बहुतेक त्यांना कळालं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr narendra dabholkars murder an attack on progressive thought solace to each other and start work