मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात आरोपी करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात नायर रुग्णालयाच्या संबंधित विभागाच्या तत्कालीन प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. चिंग लिंग चुंग चियांग यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. लवकरच त्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होईल.

डॉ. पायल यांनी वारंवार तक्रारी करूनही डॉक्टर चिंग यांनी तिन्ही आरोपी डॉक्टरांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे, आरोपींनी डॉ.पायल यांना त्रास देणे सुरूच ठेवले, असा दावा करून सरकारी पक्षाने डॉ. चिंग यांनाही प्रकरणात आरोपी करण्यास परवानगी देण्याची मागणी विशेष न्यायालयाकडे केली होती. सरकारी पक्षाची ही मागणी विशेष न्यायालयाने मान्य केली होती. या निर्णयाविरोधात डॉ. चिंग यांनी गुरूवारी उच्च न्यायालयात धाव घेऊन निर्णय रद्द करण्याची मागणी केली. तसेच, याचिकेवर अंतिम निकाल दिला कठोर कारवाईपासून दिलासा देण्याची मागणी केली.

दरम्यान, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहेरे आणि डॉ. हेमा अहुजा या तिघींवर डॉ. पायल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या तिघींना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर, या तिघीनी त्यांना प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी विशेष न्यायालयात केली होती. ती मान्य करण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला होता. डॉ. पायल तणावाखाली होत्या आणि कामाचा ताण सहन करू शकल्या नाहीत. त्याच कारणास्तव त्यांनी आत्महत्या केल्याचे भरपूर पुरावे आहेत, असा दावा आरोपींनी दोषमुक्तीची मागणी करताना केला होता. पायल अनुसूचित जमातीतील असल्याची आपल्याला कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती. त्यामुळे, जातीवरून तिची छळवणूक केल्याचा आणि तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचा दावाही तिघींनी केला होता. दरम्यानच्या काळात डॉ. चिंग यांनाही आरोपी करण्याची मागणी केली गेली. सरकारी पक्षानेही त्यादृष्टीने विशेष न्यायालयात अर्ज करून डॉ. चिंग यांना आरोपी करण्याची मागणी केली. ती मान्य केली गेली.

डॉ. पायल हिने २२ मे २०१९ रोजी नायर रुग्णालयाच्या वसतिगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला. त्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रोसिटी) गुन्हा दाखल केला होता. ……………..

Story img Loader