मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात नायर रुग्णालयाच्या संबंधित विभागाच्या तत्कालीन प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. चिंग लिंग चुंग चियांग यांना आरोपी करावे, अशी मागणी सरकारी पक्षातर्फे विशेष न्यायालयात करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. पायल यांनी वारंवार तक्रारी करूनही डॉक्टर चिंग यांनी तिन्ही आरोपी डॉक्टरांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे, आरोपींनी डॉ. पायल यांना त्रास देणे सुरूच ठेवले, असा दावा सरकारी पक्षाने उपरोक्त मागणी करताना केला. विशेष न्यायालयाने सरकारी पक्षाच्या मागणीची दखल घेऊन त्यावर सर्व पक्षकारांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. दरम्यान, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहेरे आणि डॉ. हेमा अहुजा या तिघींवर डॉ. पायल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या तिघींना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर, या तिघींनी त्यांना प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी विशेष न्यायालयात केली होती. ती मान्य करण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला होता.

हेही वाचा – दुसर्‍या टप्प्यात पाॅड टॅक्सीची शीव रेल्वे स्थानकापर्यंत धाव, १६ स्थानकांचा समावेश

डॉ. पायल तणावाखाली होत्या आणि कामाचा ताण सहन करू शकल्या नाहीत. त्याच कारणास्तव त्यांनी आत्महत्या केल्याचे भरपूर पुरावे आहेत, असा दावा आरोपींनी दोषमुक्तीची मागणी करताना केला होता. पायल अनुसूचित जमातीतील असल्याची आपल्याला कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती. त्यामुळे, जातीवरून तिची छळवणूक केल्याचा आणि तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचा दावाही तिघींनी केला होता.

हेही वाचा – मेट्रो ९ च्या कामादरम्यान सिमेंट मिक्सर ऑपरेटरचा मृत्यू, कंत्राटदार आणि सल्लागारास मोठा दंड, चौकशीसाठी समिती स्थापन

प्रकरण काय ? 

डॉ. पायल हिने २२ मे २०१९ रोजी नायर रुग्णालयाच्या वसतिगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला. त्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रोसिटी) गुन्हा दाखल केला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr payal tadvi suicide case accused the then head of nair hospital demand to special court mumbai print news ssb