लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : बीवायएल नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातून वकील प्रदीप घरत यांना विशेष सरकारी वकील म्हणून नुकतेच हटवण्यात आले. त्यांना हटवण्याच्या या निर्णयाविरोधात डॉ. पायल यांच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली असून तिच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला बुधवारी दिले.

डॉ. पायल यांच्या आई आबेदा तडवी यांनी वकील लारा जसानी यांच्यामार्फत याचिका केली असून घरत यांची खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून पुनर्नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालयाने सरकारला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

डॉ. पायल यांच्या आत्महत्येशी संबंधित खटल्याला अद्याप सुरूवात झालेली नाही. तथापि, खटल्यात सुरूवातीपासून विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणाऱ्या घरत यांना काढून टाकण्यात आले. त्यांच्या जागी वकील महेश मुळ्ये यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे, खटला निकाली निघेपर्यंत घरत यांनाच विशेष सरकारी वकील म्हणून कायम ठेवण्याची मागणी आबेदा यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पत्राद्वारे केली होती. तथापि, काहीच प्रतिसाद न मिळाल्याने आबेदा यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन घरत यांची खटल्यात विशेष सरकारी म्हणून पुनर्नियुक्ती करण्याची मागणी केली.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला घरत यांना खटल्यातून अचानक हटवण्यात आले. रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. चिंग लिंग चियांग यांना या प्रकरणात आरोपी म्हणून समाविष्ट करण्याची विनंती करणारा अर्ज घरत यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विशेष सत्र न्यायालयात केला होता. काही दिवसांपूर्वीच विशेष न्यायालयाने हा अर्ज मान्य केला आणि डॉ. चिंग यांनाही प्रकरणात आरोपी करण्यास परवानगी दिली. त्यानंतर, एका आठवड्याने घरत यांना खटल्यातून दूर करण्यात आले. रॅगिंगविरोधी समितीच्या अहवालाच्या आधारे घरत यांनी डॉ. चिंग यांना प्रकरणात आरोपी करण्याची मागणी केली होती.

दुसरीकडे, डॉ. चिंग यांनी आरोपी करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. डॉ. पायल यांनी वारंवार तक्रारी करूनही डॉक्टर चिंग यांनी तिन्ही आरोपी डॉक्टरांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे, आरोपींनी डॉ. पायल यांना त्रास देणे सुरूच ठेवले, असा आरोप डॉ. चिंग यांच्यावर आहे. तर, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहेरे आणि डॉ. हेमा अहुजा या तिघी आधीपासूनच या प्रकरणी आरोपी आहेत. त्यांच्यावर, डॉ. पायल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोप असून तिघींना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर, या तिघीनी त्यांना प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी विशेष न्यायालयात केली होती. ती मान्य करण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला होता.