जयेश शिरसाट

डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली त्या दिवसाचा घटनाक्रम हाच आरोपी डॉक्टरांविरोधातील महत्त्वाचा पुरावा ठरू शकेल, त्याद्वारे त्यांच्यावर केलेला आरोप स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती गुन्हे शाखेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

सीसीटीव्ही चित्रण, २२ मे रोजी म्हणजे डॉ. पायल यांनी आत्महत्या केली त्या दिवशी घडलेल्या घटनांच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबावर आधारित गुन्हे शाखेने घटनाक्रम तयार केला. डॉ. पायल यांनी आत्महत्या केल्याचे संध्याकाळी ७ च्या सुमारास उघडकीस आले. त्यानंतर पाऊण तासाने आरोपींपैकी दोन महिला डॉक्टर घाईघाईने डॉ. तडवींच्या खोलीत गेल्याचे आणि १५ ते २० मिनिटांनी बाहेर पडल्याचे सीसीटीव्ही चित्रणातून उघड झाले आहे. त्या मागच्या कारणांचा तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत.

आत्महत्येपूर्वी दुपारी चारच्या सुमारास शस्त्रक्रिया विभागाजवळील रिकव्हरी रूममध्ये आरोपी डॉक्टर डॉ. पायल यांच्यावर जोरात ओरडताना रुग्णालय कर्मचारी, सहकारी डॉक्टरांनी ऐकले. त्यानंतर पायल रडत रिकव्हरी रूममधून बाहेर पडून वसतिगृहातील आपल्या खोलीत आल्या. तेथून त्यांनी आपल्या आईला दूरध्वनी केला. त्या वेळी झालेल्या संभाषणात पायल निराश होत्या, हे जाणवल्याचे आईने गुन्हे शाखेला दिलेल्या जबाबात स्पष्ट केले आहे.

संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास आरोपी डॉक्टरांपैकी दोघींनी पायल यांच्या सहकारी डॉ. स्नेहल शिंदे यांना दूरध्वनी करून डॉ. पायल दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. तडवींच्या खोलीबाहेर जमा झालेल्या रुग्णालय कर्मचारी, विद्यार्थी डॉक्टरांनी दार तोडून आत प्रवेश केला तेव्हा पायल गळफास घेतलेल्या अवस्थेत होत्या. त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्याचदरम्यान दोन आरोपी डॉक्टर पायल यांच्या खोलीत परतल्या.

आरोपी डॉक्टरांनी पायल यांच्या आत्महत्येनंतर खोलीतील महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप कुटुंबाने केला होता. गुन्हे शाखेचे सहआयुक्त संतोष रस्तोगी यांना याबाबत विचारले असता, आरोपी डॉक्टर पायल यांच्या खोलीत उपस्थित होत्या. त्याची चौकशी सुरू असून या टप्प्यावर तपासात पुढे आलेली माहिती देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

घोटाळ्याची सूचना

डॉ. पायल यांनी आत्महत्येच्या एक दिवस आधी पती डॉ. सलमान यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून ‘यहा कुछ कांड हुआ हैं’, असे सांगितले होते. सलमान यांनी काय घडले हे विचारण्याचा प्रयत्न केला असता प्रत्यक्ष भेटून बोलू असे पायल यांनी सांगितले. माझ्या जीवाचे बरे वाईट झाले तर छळ करणाऱ्या तिघींना शिक्षा व्हायला हवी, असे डॉ. पायल २० मे रोजी पहाटे ३ वाजता दूरध्वनीवर बोलत असल्याचे त्यांच्या सहकारी डॉक्टरने ऐकले होते. या प्रकरणाशी संबंधित माहिती हळूहळू वेगवेगळ्या स्रोतांद्वारे मिळत असल्याचे सलमान यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

राष्ट्रीय आयोगाकडून चौकशी सुरू

राष्ट्रीय अनुसूचित जातीजमाती आयोगाने डॉ. पायल आत्महत्या प्रकरणी शनिवारी नायर रुग्णालयातील घटनास्थळाला भेट दिली. प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवून घेतले. यावेळी गुन्हे शाखेचे तपास अधिकारी सहाय्यक आयुक्त नेताजी भोपळे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Story img Loader