मुंबई : वैद्यकीय सेवा ही अत्यंत अत्यावश्यक अशी सेवा आहे. वैद्यकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी समर्पित भावनेने राज्याच्या कानाकोपऱ्यात आवश्यकता असेल तेथे वैद्यकीय सेवा दिली पाहिजे. तसेच समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो हे सतत लक्षात ठेवून, समाजाकडे चौकस बुद्धीने पाहिले पाहिजेत, असा सल्ला डॉ. प्रकाश आमटे यांनी नायर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिला.
हेही वाचा >>> “शासन आपल्या दारीसारख्या क्रांतीकारी योजनेत…”, स्वातंत्र्य दिनी मुख्यमंत्री शिंदेंनी वाचली सरकारच्या निर्णयांची यादी, म्हणाले…
बा. य. ल. नायर रुग्णालयात वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या पुढाकारने ‘उत्सव महाराष्ट्राच्या परंपरेचा’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ‘श्रावणसरी’ या दोन दिवसीय उत्सवादरम्यान मराठी भाषेचा गौरव करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांची प्रकट मुलाखत डॉ. शुभम हिरेमठ आणि विद्यार्थीनी भक्ती शिंदे यांनी घेतली. यावेळी डॉ. प्रकाश आमटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वैद्यकीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या आव्हानांचा सामना करून, धीरोदात्तपणे प्रत्येक संकटाला तोंड देत आपली सेवाभावी वृत्ती जोपासली पाहिजे, असा सल्ला देत त्यांनी सामाजिक क्षेत्रातील आपली वाटचाल आणि प्रवास उलगडून सांगितला. तसेच एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ३८ वर्षांपासून मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात याचे कौतुक आणि अभिमान असल्याची भावना डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>> गिरणी कामगारांसाठी शेलू येथे दोन हजार घरे? ‘पीएमएवाय’ योजनेतील घरे देण्यासाठी विकासक तयार
या दोन दिवसीय कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र धामणे आणि प्रशासकीय अधिकारी तेजस्वी सातपुते यांचेही व्याख्यान झाले. या कार्यक्रमादरम्यान आपले विचार व्यक्त करताना डॉ. राजेंद्र धामणे सांगितले की, ‘प्रत्येकाने स्वतःमध्ये बदल घडवायचा निश्चय केला तर समाजाची अविरत सेवा करणाऱ्या व्यक्ती तयार होतील.’ तेजस्वी सातपुते यांनी उपस्थित अशी संवाद साधताना सांगितले की, ‘वैद्यकीय महाविद्यालयात मराठी भाषेचा जागर होणे माझ्यासाठी सुखद धक्का आहे. भाषा, साहित्य आणि कला या तिन्ही बाबींचा संगम या ठिकाणी दिसून आला.’ बा. य. ल नायर रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या ३८ वर्षांपासून ‘श्रावण सरी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये मराठी नाट्य स्पर्धा, काव्य मैफिल, नृत्य स्पर्धा, भजन, गायन यासह विविध आविष्कारातून मराठीचा जागर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमादरम्यान दोन दिवसांमध्ये आहारही मराठी पद्धतीचा असतो. यामध्ये पुरणाची पोळी, श्रीखंड, मोदक, झुणका भाकरी असे पदार्थ असतात. तसेच विद्यार्थी – विद्यार्थिनींचा पोशाखही प्राधान्याने महाराष्ट्रीयन पद्धतीचा असतो. मराठी भाषेला समर्पित दोन दिवसीय उत्सवाचे आयोजन करणारे नायर वैद्यकीय महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एकमेव वैद्यकीय महाविद्यालय आहे, अशी माहिती बा.य.ल. नायर रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर मेढेकर यांनी दिली.