मुंबई : बारामतीमधील एका खाजगी रुग्णालयात एकापाठोपाठ एक लहान मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात येत होत्या. सकाळी सुरु झालेल्या या शस्त्रक्रियांचा यज्ञ सायंकाळपर्यंत सुरु होता. तब्बल २७ बालकांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सर्वच रुग्णांचे नातेवाईक अत्यंत गरीब होते. एवढ्या मोठ्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करणे त्यांना परवडणारे नव्हते. तथापि मुंबईहून आलेल्या विख्यात बालशल्यचिकित्सक डॉ. संजय ओक व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने या सर्व शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून या शस्त्रक्रिया करणयात आल्या. डॉ. संजय ओक नावाचा अवलिया निवृत्तीनंतरही गेले एक दशक राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन गोरगरीब मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा यज्ञ करीत आहे. त्यांच्या आजपर्यंतच कारकीर्दित त्यांनी सुमारे ४९ हजाराहून अधिक लहान मुल व बालकांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत.
निवृत्तीनंतरच्या गेल्या एक तपात एकाही रविवारी डॉ संजय ओक यांनी सुट्टी घेतलेली नाही. उलट सुट्टीच्या दिवशी वाडा, जव्हार, मोखाडा, शहापूर, पनवेल, चिपळूण, सातारा, वडूज, उमरज, कोल्हापूरपासून बारामतीपर्यंत राज्याच्या जवळपास प्रत्येक भागात जाऊन तेथील लहान मुलांच्या जटील शस्त्रक्रिया करण्याचे भगिरथ कार्य डॉ ओक करत आहेत. कधीकाळी मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयाचे, तसेच केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी जबादारी पार पाडली. तसेच मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे संचालक म्हणून काम केले. त्याचप्रमाणे कुलगुरू म्हणून डी.वाय.पाटील वैद्यकीय संस्थेत पद भूषवले. आपली वैद्यकीय कारकीर्द सांभाळताना तब्बल ५२ पुस्तकेही त्यांनी लिहिली. त्यांचा एकूणच प्रवास थक्क करणारा असला तरी बालशल्याचिकित्सक म्हणून त्यांनी केलेले काम असाधारण म्हणावे लागेल. लहान मुलांच्या शस्त्रक्रियेच्या प्रवासाविषयी बोलताना डॉ ओक म्हणाले, की जोपर्यंत माझ्यात काम करण्याची शक्ती आहे, तोपर्यंत गोरगरीब मुलांच्या शस्त्रक्रिया मी करतच राहाणार. चुकून जर एखाद्या रविवारी मी घरी असलो तर घरच्यांना प्रश्न पडतो की आज डॉ. ओक घरी कसे, तब्बत वगैरे बरी आहे ना, अशी विचारणा मग घरचे करतात, असेही त्यांनी सहज सांगितले. काही वळा रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांचे प्रश्न असतात तर कधी भूलतज्ञ काही कारणांमुळे येऊ शकत नाही, अशाच वेळी रविवारी मी घरी असतो अन्यथा गेल्या बारा वर्षात मी एकदाही सुट्टी घेतली नाही, असेही त्यांनी सांगितले.
अर्थात हा प्रवास एका रात्रीत झालेला नाही. यामागे मोठी तपश्चर्या आहे तसेच संस्कारांची पार्श्वभूमी आहे. १९८६ पासून म्हणजे नायर रुग्णालयात शिकत असल्यापासून लहान मुलांवरील शस्त्रक्रियेचा हा प्रवास सुरु झाला होता. तत्कालीन अधिष्ठात्री व विख्यात बालशल्यचिकित्सक डॉ स्नेहलता देशमुख यांचे मार्गदर्शन व संस्कार आमच्यावर झाल्याचे डॉ. ओक आवर्जून सांगतात. खरेतर त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला होता. मात्र वडिलांची इच्छा होती त्यांनी सर्जन बनावे. डॉ ओक यांना मेडिसिनला प्रवेश मिळाला होता. मात्र वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी सर्जरीला प्रवेश घेतला व बालशल्यचिकित्सक बनले. अधिष्ठाता, कुलगुरु तसेच प्रशासक म्हणून मी अनेक पदे भूषवली. मात्र माझ्या वडिलांनी कधीही त्या कामाविषयी मला विचारले नाही. तर रोज शस्त्रक्रिया करतोस ना असेच ते विचारायचे. त्यांच्या शेवटच्या आजारातही मी घरातून निघताना आज शस्त्रक्रिया करणार ना हाच प्रश्न विचारल्याचे डॉ ओक म्हणाले. शस्त्रक्रिया करून मी विद्यापीठात बैठकीसाठी जाणार होतो, मात्र शस्त्रक्रिया संपली तेव्हा घरी येण्याचा निरोप मिळाला. वडिलांशी झालेले तेच माझे शेवटचे बोलणे, असे सांगून माझे वडिल तसेच डॉ स्नेहलता दशमुख यांच्या संस्कारामधून ही सेवावृत्ती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मोठ्या शिबिरांच्या माध्यमातून उपचार व शस्त्रक्रिया करण्याचा मंत्र मला विख्यात नेत्रशल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून मिळाला. त्यांनीही हयातभर कुष्ठरुग्ण तसेच आदिवासी बांधवांमध्ये जाऊन त्यांच्या डोळ्यांवर उपचार केले.
निवृत्तीनंतर आरोग्य विभागाने मला शासकीय रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली. यातून शहापूर उपजिल्हा रुग्णालयांपासून अनेक शासकीय रुग्णालयात मॉड्युलर शस्त्रक्रियागृह उभी करून तेथे मोठ्या प्रमाणात आदिवासी गरीब मुलांच्या शस्त्रक्रिया करता आल्या. याशिवाय डेरवण येथे गेली अनेक वर्षे मी शस्त्रक्रिया करत आहे. सुरुवातीच्या काळात जसे जमेल तसे शस्त्रक्रिया करत होतो. हळूहळू अनेक डॉक्टरांची साथ मिळत गेली. महापालिकेच्या शीव रुग्णालयातील अनेक तरुण डॉक्टर स्वयंप्रेरणेने माझ्याबरोबर जोडले गेले. त्याचबरोबर डॉ. राकेश शहा, डॉ. पारस कोठारे, डॉ. नम्रता कोठारी, डॉ. अभय गुप्ता, डॉ. आदिती दळवी अशी अनेक नावे सांगता येतील. महापालितकेच्या रुग्णालयात येणारा गरीब रुग्ण व नातेवाईकांच्या शर्टाला खिसा नसतो. मात्र शहापूर, वाडा, जव्हार येथील गरीबांच्या अंगावर शर्टही नसतो. बहुतेक आदिवासी लंगोटी घालून येताता. ही परिस्थिती पाहिल्यानंतर लक्षात येते अजूनही आपली शासकीय आरोग्य व्यवस्था खऱ्या अर्थाने गरीबांपर्यंत पोहोचलेली नाही. शहापूरच्या रुग्णालयात एका धनगर मुलावर शस्त्रक्रिया केली. मुलगा बरा झाल्यानंतर त्याच्या आजोबाने मुंडासे – घोंगडी व घुंगरू असलेली काठी भेट दिली. यात त्यांची कृतज्ञता दिसत होती ज्याचे मोल पैशात होऊ शकत नाही, असेही डॉ ओक म्हणाले.
गेल्या वर्षभरात ११८७ शस्त्रक्रिया केल्या, तर आजवरच्या शल्य प्रवासात ४९ हजाराहून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. अनेकदा काही मोठ्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना महापालिकेच्या शीव रुग्णालयात किंवा ठाण्यातील कौशल्या रुग्णालयात दाखल करून उपचार करतो. यात माझ्या शिशू शल्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपचाराचा आर्थिक भार सांभाळला जातो. काही कंपन्या त्यांच्या सीएसआर निधीमधून लहान मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करतात, असेही डॉ ओक यांनी सांगितले. मी लहान मुलांच्या शस्त्रक्रिया करण्यात रमतो. जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत मी गोरगरीब रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करत राहाणार. आज अनेक तरुण डॉक्टरही माझ्या विचारांवर चालू पाहात आहेत. माझ्यावरही काही संस्कार होते त्यातून मी घडलो आता पुढची डॉक्टरांची पिढीही माझ्याबरोबर वाटचाल करत आहे हाही एक मोठा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.