मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीत गटनेतेपदी मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली. पक्षाला मिळणाऱ्या मंत्रिपदात पुत्राचा विचार केला जाणार नाही, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सन्मान केला. शिंदे गटाच्या खासदारांनी इंडिया आघाडीच्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात राहू नये, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने महायुतीत १५ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी सात जागांवर विजय मिळाला. श्रीकांत शिंदे ( कल्याण) नरेश म्हस्के ( ठाणे) बुलढाणा ( प्रतापराव जाधव) औरंगाबाद ( संदीपान भुमरे) हातकणंगले (धैर्यशील माने) श्रीरंग बारणे (मावळ) आणि रवींद्र वायकर ( वायव्य मुंबई) बैठकीला उपस्थित होते. शिवसेना शिंदे गटाला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद मिळावे, ही अपेक्षा आहे.