बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी डॉ. सुधाकर शिंदे यांचे स्वागत केले.
डॉ. शिंदे यांनी पुणे येथील बी. जे. मेडिकल वैद्यकीय महाविदयालयातून एमबीबीएस पदवी संपादित केली. औषधनिर्माणशास्त्रामध्ये त्यांनी संशोधन देखील केले. त्यानंतर भारतीय राजस्व सेवेत (I.R.S.) त्यांनी २००७ मध्ये प्रवेश केला.
हेही वाचा >>>मुंबई: परिसरातील कचऱ्याची आजपासून ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’वर तक्रार करता येणार
राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटी अंतर्गत महात्मा फुले जन आरोग्य अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने जबाबदारी सांभाळताना कोविड संसर्ग कालावधीत डॉ. शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. विशेषतः कोविड चाचण्यांची दर निश्चिती, मास्क व निर्जंतुकीकरण द्राव्य (सॅनिटायझर) यांची दर निश्चिती, खासगी रुग्णालयांमध्ये शासकीय दराने कोविड रुग्णांवर उपचार करणे, जादा देयक आकारणाऱया रुग्णालयांचे नियमन करुन तक्रारींचे निराकरण व रुग्णांना परतावा मिळवून देणे या सर्व बाबींची त्यांनी शासन निर्णय स्वरुपात केलेली अंमलबजावणी अतिशय परिणामकारक ठरली. त्याचप्रमाणे, पनवेल महानगरपालिका आयुक्त म्हणून कामकाज सांभाळतानाही त्यांनी विशेष ठसा उमटविला आहे.