ज्येष्ठ प्राध्यापकांचाही एकमुखी ठराव!
महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये सर्वात ज्येष्ठ प्राध्यापक असलेल्या शीव रुग्णालयातील डॉ. सुलेमान र्मचट यांना कायमस्वरुपी अधिष्ठातापदापासून डावलण्याच्या प्रशासनाच्या उद्योगामुळे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. शीव रुग्णालयातील ज्येष्ठ प्राध्यापकांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत डॉ. र्मचट यांचीच पदोन्नतीने अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्याचा ठराव एकमुखी मंजूर करण्यात आला.
पालिकेच्या शीव, नायर, केईएम या वैद्यकीय महाविद्यालयांपैकी शीव व नायरमध्ये अधिष्ठाता पद रिक्त असल्यामुळे यातील एक पद पदोन्नतीने व दुसरीजागा राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएसी) माध्यमातून भरणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पालिका प्रशासनाने दोन्ही पदे ‘एमपीएसी’च्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतना अधिष्ठातापदाच्या पात्रतेचे निकष डॉ. र्मचट यांना डावलण्यासाठी बदलण्यात आल्याचे ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉ. र्मचट यांचा अध्यापनाचा एकूण अनुभव ३१ वर्षे आहे. एमपीएससीच्या जहिरातीमध्ये ३२ वर्षांचा अनुभव मागण्यात आला. तसेच पदव्युत्तर ‘डीएनबी’ शिक्षण पूर्ण केलेल्यांसाठी अनुभवाची अट शिथिल करण्यात आली. डॉ. र्मचट यांनी ही बाब मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पालिका आयुक्त सीताराम कुंटे आदी सर्वाच्या पत्राद्वारे निदर्शनास आणल्यानंतरही यात बदल न झाल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. न्यायालयानेही याची गंभीर दखल घेऊन आयुक्तांनी एक महिन्यात योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेश दिले आहेत.
डॉ. र्मचट यांच्याप्रमाणे भविष्यात अन्य डॉक्टरांवरही प्रशासनाकडून असाच अन्याय केला जाईल हे लक्षात घेऊन शीव रुग्णालयातील सर्व अध्यापकांनी एक बैठक घेतली. या बैठकीत सेवाज्येष्ठता डावलता येणार नाही, तसेच निनावी तक्रारींची दखल प्रशासनाने घेऊ नये या मागण्यांसह डॉ. सुलेमान र्मचट यांचीच अधिष्ठातापदी नियुक्ती करण्याचा एकमुखी ठराव मंजूर केला. यापूर्वी निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने तसेच सुमारे पचशे विद्यार्थ्यांनीही आयुक्तांकडे पत्र लिहून डॉ. र्मचट यांच्यावर अन्याय न करण्याची मागणी केली आहे.

Story img Loader