विख्यात नेत्रशल्यविशारद व जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने यांना ‘हंगामी’ सहसंचालक म्हणून ‘पदोन्नती’ देऊन जे.जे.मधून हलविण्याचा घाट घालण्यात आला आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने फाईल तयारही केली होती. तथापि नियमानुसार ‘हंगामी पदोन्नती समिती’ची बैठक न घेता बदली केल्यास अडचणीत येऊ हे लक्षात घेऊन मंत्रालयातील उच्चपदस्थांनी येत्या दोन दिवसात समितीची बैठक घेऊन हंगामी पदोन्नती देण्याचा निर्णय घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
डॉ. लहाने यांच्या बदलीचे यापूर्वीही काही घाट घालण्यात आले होते. अलीकडेच नेत्रचिकित्सा विभागातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांनी केलेली तक्रार व निवासी डॉक्टरांनी केलेल्या संपाच्यावेळी त्यांची बदली करण्याची योजना होती. तथापि न्यायालयाने ‘मार्ड’ला चाप लावल्यामुळे डॉ. लहाने यांची बदली होऊ शकली नाही. राज्य शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील अधिष्ठात्यांमध्ये डॉ. लहाने हे सर्वात ज्येष्ठ असल्यामुळे त्यांची हंगामी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे असून जे.जे. च्या अधिष्ठातापदासाठी पुण्याचे डॉ. चंदवाला व अमरावती येथील डॉ. राठोड बदली होण्याची शक्यता आहे. या बदलीलाही विरोध असल्यामुळे जे.जे.मधील स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. रेखा डावर यांच्याकडे अधिष्ठाता म्हणून हंगामी पदभार दिला जाऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले.
हंगामी सहसंचालक नियुक्तीचा निर्णय
आता वैद्यकीय शिक्षण संचालनालयात डॉ. लहाने, डॉ. बारपांडे व डॉ. वाखोडे हे तिघे सहसंचालकपदाची जबाबदारी हंगामी म्हणून सांभाळत असून यातील डॉ. वाखोडे यांना पूर्णवेळ सहसंचालक म्हणून, तर डॉ. लहाने यांना हंगामी सहसंचालक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे.